Indapur Crime: स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा, दोघांना अटक ; वालचदंनगर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. इंदापूर तालुक्यातील तावशी गावाच्या स्मशानभूमीमधील लाकडामध्ये मानवी अवयव जळत असून बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्मशानभूमीतील अर्धवट जळालेल्या लाकडावरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणून याप्दोरकरणी घांना अटक केली आहे.

दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३, दोघे रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४, रा. गंगाखेड, परभणी) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील तावशी येथील स्मशानभूमीत १६ नोव्हेंबर रोजी लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून बाजूला जास्त प्रमाणात रक्त पडलेले अशी माहिती तावशी येथील पोलीस पाटील यांच्याकडून मिळाली. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार डुणगे व त्याचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहिले की, स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेले हाडे तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. जळालेली लाकडे व इतर लाकडे दिसत होती. नेमके काय जळाले आहे, हे समजू येत नव्हते.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या सुचनेनुसार वालचंदनगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. स्मशानभूमीत मिळालेली लाकडे कोणत्या वखारीमधील आहेत, त्याचा तपास इंदापूर, माळशिरस व फलटण तालुक्यामध्ये जाऊन करण्यात आला. त्यात फलटण तालुक्यातील गुणवरे येथील वखारीमधील ही लाकडे असून ती दादासाहेब हरिहर व त्यांचा मित्र विशाल खिलारे यांनी ही लाकडे खरेदी करुन अंत्यविधीसाठी वाहनांमधून नेल्याची माहिती मिळाली. त्यावरुन दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. हरिभाऊ जगताप मामा हा लग्न जुळविण्याची कामे करीत असत. त्यातूनच त्याची दादासाहेब हरिहर याच्या पत्नीवर वाईट नजर होती. त्या कारणावरुन दोघांनी कट रचून माण तालुक्यातील टाकेवाडी येथील सतोबाची यात्रेसाठी मामाला गाडीतून गंगाखेड येथून निघाले. मध्यरात्री तावशी येथील स्मशानभूमीजवळ लघवीला म्हणून गाडी थांबवून त्यांनी मामाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जाळून टाकले. पोलिसांनी याची माहिती त्यांचा मुलगा सचिन हरिभाऊ जगताप (वय ४६, रा. कोल्हापूर) यांना सांगून त्यांची फिर्याद घेतली.

या घटनेमध्ये तावशी स्मशानभूमीमध्ये नक्की काय घटना घडली आहे, याची पूर्णपणे शाश्वती नसताना कोणताही पुरावा नव्हता. केवळ स्मशानभूमीमध्ये मिळालेली लाकडे व पडलेल्या रक्तावरुन घातपायाचा संशय बळावल्याने वालचंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करुन हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तसेच सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, शैलेश स्वामी, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, पोलीस अंमलदार अभिजित कळसकर, यांनी केली आहे.