पुष्प प्रदर्शनाने बहरले पुण्यातील एम्प्रेस गार्डन
एम्प्रेस गार्डन मधील पुष्प प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एम्प्रेस गार्डन मधील पुष्प प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

घोरपडी – एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्वस्त अनुपमा बर्वे, सुमन किलोस्कर, डॉ श्रीनाथ कवडे, प्रशांत काळे, प्रशांत चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की एम्प्रेस गार्डन हे पुणेकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचे ठिकाण असून कायम असा खुले राहावे. गार्डनचा सरकारशी असलेला करार संपला होता तेव्हा करार पुन्हा करून देण्याचे भाग्य मला पुण्याचा जिल्हाधिकारी म्हणून लाभले. गार्डनसोबत कॉलेज पासून अनेक आठवणी असून मला येथे यायला नेहमी आवडते.ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने २५ ते २९ जानेवारी दरम्यान पुष्पप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पुष्पप्रदर्शन २६ ते २९ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करण्यात आले आहे. तसेच मोना पिंगळे यांच्या स्मरणार्थ इकेबाना (जपानी फुलांची व्यवस्था) विशेष स्टॉल आहे.प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय झाडे यांची आकर्षक पद्धतीने सजावट केली. तसेच नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थाचे असे विविध स्टॉल येथे आहेत.
रंगीबेरंगी व विविध प्रकारच्या फुलांनी गार्डन बहरले आहे. येथे एक दोन नव्हे, जवळपास ३.५० लाख सिझनल व विदेशी फुलांच्या रंगाने हे गार्डन फुलून गेले आहे. यामध्ये प्रामुख्याने सेलोशिया, झेंडू, डायनथस, पानसी, गुलाब इतर शोभेचे फुले आहेत. या पुष्प प्रदर्शनात फुलांसोबत निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांची, कुंड्यांची आकर्षक मांडणी करून पाने, व इतर साहित्य वापरून विविध मनमोहक पुष्परचना तयार केली आहे. या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे एका खाजगी कंपनीने आकर्षक व सुंदर बागेच्या प्रतिकृती केली आहे.पुष्पप्रदर्शनामध्ये पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक सहभागी होण्याकरिता आले आहेत.
