गावगाथाठळक बातम्या
Auto rickshaw strike: पुण्यात ५ जुलैला रिक्षा बंद ; बाईक टॅक्सी विरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा एल्गार

पुणे (प्रतिनिधी): पुण्यात ५ जुलैला रिक्षा चालकांनी संप पुकारला आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यात बाईक टॅक्सीला हिरवा कंदील दाखवला. आधीच चालू ठेवलेल्या खुल्या परवान्यामुळे शहरात भरमसाठ झालेली रिक्षांची वाढ तसेच ओला, उबेर सारख्या कंपन्यांकडून कमी दर देऊन रिक्षाचालकांची होत असलेल्या पिळवणूकीमुळे रिक्षाचालक हतबल झाला आहे. ही पिळवणूक थांबवावी. या अशा अनेक मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा संप असणार आहे.

तसेच पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात येणार आहे.

या आहेत रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या...
- राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये.
- वाहन फिटनेस विलंब प्रतिदिनी असलेली ५० रुपये दंड त्वरित रद्द करावी.
- ओला- उबेर सारख्या कंपन्या बंद करून सरकारी ॲप उपलब्ध करून द्यावे.
- रिक्षाचे मुक्त परवाना धोरण त्वरित बंद करण्यात यावे.
- रिक्षाचालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी.