सलगर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची शालेय मंत्रिमंडळाची वार्षिक निवडणूक संपन्न..
निवड नियुक्ती

सलगर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची शालेय मंत्रिमंडळाची वार्षिक निवडणूक संपन्न..

विशेष प्रतिनिधी: अमोल धडके

लोकशाहीच्या व्याख्येनुसार “लोकांद्वारे, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य” म्हणजेच लोकशाही होय. लोकशाही ही अशी शासनप्रणाली आहे. ज्याच्या अंतर्गत जनता निवडणुकीत उतरलेल्या कोणत्याही पक्षाला आपले मत देऊन आपले प्रतिनिधी निवडू शकते. आणि आपले सरकार स्थापन करू शकते. लोकशाहीची मुख्य तत्त्वे आहेत- स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्वाभिमान आणि सहिष्णुता ह्याच धरतीवर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.
शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी निवडणूक कार्यक्रम दि.१३ जुलै २०२४ रोजी पार पडली. शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. कु. साक्षी गजानंद स्वामी, कु. नवेता शिवराज पाटील, कु. तनुजा उमेश शिंगे, उमेदवार होते.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सहावी ते सातवीच्या एकूण ५१ मतदारांपैकी ५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या आवडत्या उमेदवाराला आपले मत देत मतदान पेटीत जमा केले. अतिशय शांततेत शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या सन २०२४-२५ च्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे यांनी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका सांभाळली. तर अनिता काटकर, हाजराबी बागवान,संध्या बशेट्टी यांनी मतदान अधिकाऱ्याची भूमिका सांभाळली. सदर निवडणूक यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सदर शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठीच्या सन २०२४-२५ च्या वार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि.१५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये होणार आहे.
