गावगाथाठळक बातम्या

PCMC Red zone : पिंपरी चिंचवड ‘रेड झोन’ ची मोजणी पूर्ण ; मिळणार अचूक माहिती

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन हद्दीच्या मोजणीचे काम शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने सॅटेलाईट इमेजद्वारे पूर्ण केले आहे. ही माेजणी अचूक झाली असून अंतिम नकाशा पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

येत्या १५ दिवसांत रेडझोनची अचूक आणि स्पष्ट सीमा असलेला अधिकृत नकाशा उपलब्ध होणार आहे. नकाशा उपलब्ध झाल्यानंतर शहरातील रेडझाेनबाधित मालमत्तांची अचूक माहिती मिळणार आहे. 

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून २ हजार यार्ड ( १.८२ किलोमीटर) परिघात रेडझोनची हद्द आहे. दिघी मॅगझिन डेपोपासून १ हजार १४५ मीटर रेडझोन हद्द आहे. त्या परिघात कोणतेही बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे शहरातील लाखो कुटुंबे प्रभावित आहेत. रेडझोनची सीमा अस्पष्ट असल्याने मोजणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात हाेती. अखेर, त्या मोजणीस संरक्षण विभागाने परवानगी दिली. मोजणीसाठी महापालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे एकूण १ कोटी १३ लाख ६७ हजार ३०० रुपये शुल्क भरले हाेते.

मे महिन्यामध्ये भूमी अभिलेख विभागाकडून सॅटेलाईट इमेजद्वारे मोजणीच्या कामाला प्रारंभ केला हाेता. देहूरोड व दिघी डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून निश्चित केलेल्या हद्दीपर्यंत ही मोजणी केली आहे. या मोजणीत सर्व मालमत्ता, बांधकामे, मोकळी जागा, रस्ते, झाडे व इतर संसाधन असे सर्व बाबींचा समावेश आहे. रेडझोन हद्द सीमेची सॅटेलाईट इमेजद्वारे माेजणी केल्यामुळे नागरिकांसाठी अचूक नकाशा उपलब्ध हाेणार आहे.

राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाला हद्द दाखविण्यात आली हाेती. त्यानुसार रेडझोन हद्दीची मोजणी पूर्ण केली आहे. सध्या रेडझाेनचा अचूक नकाशा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच शहरातील रेडझाेन हद्दीत किती मालमत्ता आहे, हे स्पष्ट हाेणार आहे. येत्या १५ दिवसात नागरिकांना अंतिम नकाशा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. 

– प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना विभाग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button