अक्कलकोट मध्ये उभारणार भव्य-दिव्य १०८ फूट श्री स्वामी समर्थांचे शिल्प स्वामीभक्तांमध्ये आतापासूनच जल्लोषाचे वातावरण..
अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अक्कलकोट मध्ये उभारणार भव्य-दिव्य १०८ फूट श्री स्वामी समर्थांचे शिल्प स्वामीभक्तांमध्ये आतापासूनच जल्लोषाचे वातावरण..


लक्षावधी भक्ताचे श्रद्धास्थान असणारे श्रीदत्त अवतारी श्री स्वामी समर्थांचे स्वामी दिव्य दर्शन साकारले जाणार असून यामध्ये १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती शिल्प २० एकर जागेवर साकारले जाणारा असून महाराष्ट्रातील हे पहिले स्वामींचे दिव्य दर्शन भक्तांच्या साठी श्रध्दास्थान ठरेल अशी माहिती अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पत्रकार
परिषदेत दिली.


श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य २२वर्षे प्राचीन वटवृक्षाखाली होते. तेथे अक्कलकोट राजघराण्याने वटवृक्ष मंदिर निर्मिती केली. श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीमंत शहाजीराजे भोसले (तिसरे) यांना दृष्टांत देऊन आपण अक्कलकोट मधे येणार असल्याचे दर्शविले आणि श्रीमंत मालोजीराजे भोसले (दुसरे) यांच्या काळात श्री स्वामी समर्थ महाराज राजराण्याच्या श्री गणेश पंचायतन मंदिरात नवरात्रात ललित पंचमी दिवशी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना दर्शन दिले.
अक्कलकोट राजराण्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा दृष्टी आहे. अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी या कामी पुढाकार घेतला असून राज घराण्याची राम तलावासह वीस एकरच्या विस्तीर्ण जागेवर स्वामी दिव्य दर्शन हा संकल्प साकारला जाणार आहे.

सोलापूरचे तरुण शिल्पकार सागर रामपुरे हे स्वामींची भव्य मूर्ती साकारणार आहेत 18 इंचाचे स्केल मॉडेल त्यांनी बनविले असून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केली आहे. सात फूट उंचीचे शिल्प तयार केले जाईल त्यानंतर 108 फूट उंचीचा स्वामींची मूर्ती बनवण्याचे काम सुरू होईल.
अक्कलकोट राजघराण्याच्या राम तलाव आणि वीस एकराचा परिसर निसर्गरम्य आहे येथे स्वामीचे आगमन ते निर्वाणा पर्यतचे 50 च्या आसपास निवडक प्रसंगमूर्ती स्वरूपात साकारले जाणार आहे. यात स्वामींच्या सोबत त्या काळी जे भक्त होते त्यांचेही शिल्प असणार आहेत, हा संकल्प प्रकल्प दोन टप्प्यात साकारला जाईल. पहिल्या टप्प्यात 108 फूट उंचीची स्वामींची भव्य मूर्ती साकारली जाणार असून यासाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील दुसऱ्या टप्प्याचे काम नंतर सुरू करण्यात येईल.
हा प्रकल्प साकार करण्यासाठी भगवान रामपूरे यांचा मुख्य सहभाग असून सागर आणि देवेन रामपूरे सहभागी असतील संपूर्ण प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होईल.
भगवान रामपूरे म्हणाले, स्वामीची शिल्पसृष्टी उभी करणे हे माझे स्वप्न आहे. अंजठा वेरूळला जशी अद्भुत लेणी आहे. त्याप्रमाणे स्वामीची शिल्पसृष्टी मला उभी करायची आहे. कोकणात जागा घेऊन ती साकारण्याचा विचार होता. परंतु नंतर तो काही कारणामुळे मागे पडला. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराच्या डोंगरावर १०८ फूट उंचीचा आय शंकराचार्य यांचा पुतळा उभा केला. त्या अनुषंगाने दुरचित्रवाहिनीने माझी एक विस्तृत मुलाखत घेतली आणि दाखवली. या मुलाखतीत मी स्वामी समर्थांच्या शिल्पसृष्टी संकल्पना मांडली होती. तत्कालिन अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांनी ती मुलाखत पाहिली. त्यांना माझी संकल्पना आवडली, त्यांनी माझी ती मुलाखत अक्कलकोट नरेश श्रीमत मालोजीराजे भोसले यांना पाठवून दिली. श्रीमंत मालोजीराजे यानी पाहिली आणि नंतर मला फोन केला. स्वामी समर्थांची शिल्पसृष्टी उभी करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची हमी दिली. नंतर आम्ही अक्कलकोटला गेलो. दोन चार बैठकाही झाल्या प्रत्यक्ष जागादेखील पाहिली स्वप्नात जशी जागा पाहिली होती अगदी तशीच हुबेहूब जागा मिळाली. मनाला खुप आनंद झाला. पंधरा वर्षापूर्वी मी जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरण्याची प्रक्रिया सुरु झाली. याचा आनंद अवर्णनीय आहे. तो शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे असेही भगवान रामपुरे म्हणाले.
स्वामी समर्थांचे पहिले शिल्प २००८ मध्ये बनवले. त्यापूर्वी एकदा स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेलो होतो. वटवृक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मन प्रसन्न झाले. तेथून परतताना स्वामींची सिंहासनावर विराजमान मुर्ती डोळ्यासमोरून हटत नव्हती. माझ्यातला कलावत जागा झाला, मनोमन मी स्वामींना प्रार्थना केली. स्वामी, माझ्या हातून आपले शिल्प घडवून घ्यावे अशी विनवणी केली. आणि स्वामींनी ती ऐकली. आज महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात जवळपास चाळीस ते पन्नास स्वामींची मंदिरे आहेत. जिथे मी बनवलेली स्वामीची मुर्ती विराजमान आहेत. हे कार्य मी केले असे म्हणणे म्हणजे आत्मप्रौढी ठरेल. पुण्याचे सद्गुरु आनंद पेठे काका यांची प्रेरणा आणि स्वामी समर्थांचा आशिर्वाद यामुळेच हे कार्य सिध्दीस गेले असे मी म्हणेन, असेही रामपुरे यांनी सांगितले.
योगायोग किंवा दैवी संकेत पहा श्री स्वामी समर्थ श्रीमंत मालोजीराजे भोसले (दुसरे) यांच्या काळात अक्कलकोट मधे आले आणि आता स्वामी दिव्य दर्शन प्रकल्प श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांच्या कारकिर्दीत साकार होत आहे.