Chinchwad Rain: चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली ; पवना धरणाच्या सांडव्याद्वारे पवना नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा… चिंचवड मध्ये रुग्णवाहिका बुडाली…
चिंचवड (प्रतिनिधी): पवना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पवना धरण जलाशय आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता ७२ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार पवना धरणातून कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रुग्णवाहिका पाण्यात बुडाली….
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरा शेजारी असलेल्या मैदानात काल एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता तेथे महापालिकेची एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अचानकपणे नदी पात्रातील पाणी वाढले आणि पार्क केलेली रुग्णवाहिका काही मिनिटात पाण्यात पूर्णपणे बुडाली आहे.