बासलेगाव रस्त्यावरील श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने नागपंचमी निमित्ताने खास महिलांच्या सोयीसाठी झोका बांधण्यात आले
झोका खेळण्याच्या कार्यक्रमाचे शुभारंभ वेदमूर्ती रुद्रय्या स्वामी व ज्योतिष विशारद गुड्डय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

अक्कलकोट, दि. ८- येथील शहरातील बासलेगाव रस्त्यावरील श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने नागपंचमी निमित्ताने खास महिलांच्या सोयीसाठी झोका बांधण्यात आले असून या झोका खेळण्याच्या कार्यक्रमाचे शुभारंभ वेदमूर्ती रुद्रय्या स्वामी व ज्योतिष विशारद गुड्डय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी डीसीसी बॅंकेचे माजी अधिकारी विजयकुमार हौदे हे होते.

यावेळी माजी नगरसेवक केरबा होटकर, नागराज कुंभार, माजी सैनिक अनिल हत्ते, श्री लक्ष्मी मंदिराचे प्रमुख बाबुराव विभूते, माजी प्रा. चंद्रकांत पाटील, विवेकानंद पतसंस्थाचे शाखाधिकारी चंद्रकांत दसले, मंडळाचे प्रमुख रमेश शिंदे, दिगंबर साळुंके, बसवराज आगरखेड, सागर शिंदे, वैदेश गुरव, सचिन डिग्गे, शांतविरप्पा दसले, पत्रकार विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते.

शहरातील महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून हद्दवाढ भागात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने पहिल्याच वर्षी
खास महिलांसाठी ‘उंच माझा झोका’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय महिलांच्या आस्थेचे प्रतीक असणारा श्रावण महिन्यातील हा सण सांस्कृतिक वारसा आहे. त्याची जपणूक करण्यासाठीच आपण हा उपक्रम घेतल्याचे मंडळाचे प्रमुख दिगंबर साळुंके व कार्याध्यक्ष चंद्रकांत दसले
यांनी सांगितले.
तर मंडळाचे संस्थापक रमेश शिंदे यांनी यासारखे उपक्रम आपण कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

नागपंचमी निमित्त झोके बांधण्यासाठी शहरात आता पूर्वीसारखी भली मोठी झाडे नाहीत. त्यात करमणुकीची साधने वाढल्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांकडे महिलांचा ओढा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे लाकडी वासेसह कृत्रिम सांगाडे लावून साजरी होणारी नागपंचमी महिलांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरणार आहे.

तरी शहर व परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद साजरा करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागपंचमी यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
चौकट
नागपंचमीला शहर व परिसरातील भागात झोक्यांचे वेगळे महत्व आहे. मात्र आता डेरेदार वृक्ष आणि त्याखाली असणारे झोके झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला म्हणत उंच झोका घेण्याची परंपरा अन् त्याभोवती पिंगा घालणाऱ्या मित्र – मैत्रिणी हे चित्र बदलले आहे. वृक्षतोडीचे लोन वाढत गेल्याने झाडांअभावी झोके लाकडी वासेला अथवा लोखंडी रॉडला बांधण्याची वेळ आली आहे. श्रावण महिना हा भारतीय संस्कृती धार्मिक व्रत वैकल्यांसाठी महत्वाचा आहे. त्यात महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात श्रावणातला पहिला सण म्हणुन नागपंचमीचे वेगळे महत्व आहे. या दिवशी महिला वर्गात वारुळाची पुजा केल्यानंतर सर्व मैत्रिणी गावातील चिंब, लिंब अशी डेरेदार झाड शोधायची अन् त्यावर जाड दोराचा झोका बांधत दिवसभर झोका खेळायच्या. यात कुणाचा झोका कीती उंचावर जायचा याच्या स्पर्धा देखील रंगायच्या. त्या निमित्तानं झोक्यावर आधारीत महिला वर्ग गाणे म्हणायच्या. त्यामुळे एक वेगळी अनुभुती निर्माण झाल्याचे चित्र असायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गाव गाड्याचा अविभाज्य असणारी डेरेदार वृक्ष गडप झाली आहे. सामाजिक व सेवाभावी संघटनांनी खास महिलांसाठी नागपंचमी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून
ठिकठिकाणी मोठमोठे झाडाच्या किंवा लाकडी वासेला झोका बांधून सोय करणे आवश्यक आहे.