गावगाथा

अक्कलकोटच्या गणपती मंदिरात नंदीएवढा मूषकराज अखंड पाषाणातील कोरीव शिल्प; मालोजीराजे (तिसरे) यांच्याकडून आजही सेवा

गणेश दर्शन

अक्कलकोटच्या गणपती मंदिरात नंदीएवढा मूषकराज अखंड पाषाणातील कोरीव शिल्प; मालोजीराजे (तिसरे) यांच्याकडून आजही सेवा…

प्रतिनिधी l अक्कलकोट
अक्कलकोटच्या जुना राजवाडा परिसरात गणपती पंचायतन मंदिर आहे. येथे तब्बल चार फुटांचा दगडी उंदीर (मूषकराज) आहे. विशेष म्हणजे हे शिल्प अखंड पाषाणातील आहे. इतका मोठा नसला तरी फुटा दीडफुटाचे उंदीरमामा गणपतीपुळे, मुंबईचा सिद्धिविनायक सोडला तर अन्यत्र पहावयास मिळत नाही. तसेच पाषाणातील इतका मोठा उंदीर तसा दुर्मिळच आहे.

सोलापूरपासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असणाऱ्या अक्कलकोट यातील जुन्या राजवाड्याजवळ एक पुरातन गणेश मंदिर आहे. याचे वैशिष्ट्य असे की, या मंदिरातील गणेश मूर्तीसमोर नंदीएवढा मोठा उंदीरमामा आहे. तोही हातात भला मोठा लाडू घेऊन खात बसलेला, काळ्या पाषाणातील ही मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती
तर कोरीव असून, सिद्धीविनायकाप्रमाणे ती आहे, पण उंदीरही तितकाच आकर्षक आहे. अंदाजे अडीच फूट कठड्यावर हा उंदीर आहे. एरवी आपण शंकराच्या मंदिरात शंकराचे वाहन असलेल्या मोठमोठ्या नंदीच्या मूर्ती पाहतो. पण या गणेश मंदिरात नंदीइतकीच मोठी उंदराची मूर्ती आहे. पुढच्या दोन हातात त्याने लाडू पकडलेला आहे.
हे मंदिर पुरातन आहे, असे एकूण त्याच्या जुन्या स्वरूपाकडे पाहता लक्षात येते.

चौकट १)अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) भोसले-
श्रीमंत मालोजीराजे भोसले हे अक्कलकोट संस्थानच्या सिंहासनी बसताच काही दिवसात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. याच मंदिरात श्री स्वामी समर्थ बसत आणि येथेच श्री स्वामी समर्थ व श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) यांची पहिली भेट याच मंदिरात झाली. मंदिरातील मूषक हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. –

चौकट २) पंचायतन मंदिर –

या गणेश मंदिराच्या परिसरात मुख्य गणपती मंदिराच्या चारही दिशांना चार वेगवेगळ्या देवीदेवतांची मंदिरे आहेत. श्रीगणेश कार्तिकयासमवेत श्रीशिव परिवारासहीत मूर्ती असलेले शिव मंदिर, सात अश्वांच्या रथासह श्री सूर्यनारायणाचे मंदिर, श्री जगदंबा मंदिर आणि श्रीविष्णूचे मंदिर असा हा पाच मंदिरांचा समूह म्हणजे पंचायतन मंदिर होय. म्हणून या मंदिरास श्रीगणेश पंचायतन असे म्हणतात.

चौकट ३)पंचायतन मंदिरात सूर्यमणीचे दर्शन

गुरुपौर्णिमेच्यादिवशी याच मंदिरात एक सूर्यमणी भाविकांना दर्शनासाठी ठेवला जातो. हा सूर्यमणी विशिष्ट प्रकारचा असून, खुद्द श्री स्वामी समर्थ महाराजांनी तो मालोजीराजांना दिला होता. हा सूर्यमणी वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी दर्शनाला याच मंदिरात ठेवला जातो.

अक्कलकोट फोटो – श्री पंचायतन गणेश मंदिर व मंदिरातील पुरातन अशी गणेश मूर्ती (दुसऱ्या छायाचित्रात) हाच तो नंदीएवढा मोठा उंदीर (मूषक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button