ST Bus : मोठी बातमी ; एसटी ची हंगामी भाडेवाढ अखेर रद्द ; प्रवाशांना दिलासा
मुंबई (प्रतिनिधी): दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.


यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्याभरात एसटीनं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.


हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. आता मात्र त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असतात. 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.