हुसेन इलेव्हन किंग्ज MPL विजेता
अक्कलकोट तालुका मुस्लिम प्रीमियर लीग 2024 पर्व 3 चा विजेता हुसेन इलेव्हन किंग्ज ठरला.

हुसेन इलेव्हन किंग्ज MPL विजेता
अक्कलकोट तालुका मुस्लिम प्रीमियर लीग 2024 पर्व 3 चा विजेता हुसेन इलेव्हन किंग्ज ठरला. अंतिम सामन्यात नूर इलेव्हन रायडरशी गाठ पडलेल्या संघाचा 5 खेळाडू राखून पराभव केला.
अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यात, नूर इलेव्हन चा कर्णधार राजू बागलकोटे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. नूर इलेव्हनची सुरवात अतिशय खराब झाली.डावाच्या पहिल्याच चेंडूवर महम्मद पठाण यष्टीरक्षकाकरवी झेल देऊन, वेगवान गोलंदाज आफताबचा बळी ठरला. डावास आकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एच.पी. आसिफ हा केवळ 6 धावावर परतला, त्या पाठोपाठ महिबूब सातलगाव याने एका षटकाराच्या मदतीने 8 धावावर तंबूची वाट पकडली. गोलंदाजीस पोषक ठरलेल्या बोरगावच्या खेळपट्टीवर अनुभवी कर्णधार राजू बागलकोटे व स्फोटक फलंदाज मुबारक यास सोबत घेऊन खेळाची सुत्रे आपल्या हाती घेत जलद गतीने धावा जमावण्यास सुरुवात केली.या जोडगोळीने 24 चेंडूत 43 धावा कुटल्या. मात्र संघाची धावसंख्या 69 असताना कर्णधार राजू एक चौकार व एक षटकाराच्या मदतीने 20 धावा काढून बाद झाला. स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभी राहील असे वाटत असताना, धुवांधार फलंदाजी करणारा मुबारक सुध्दा राजू पाठोपाठ बाद झाला. 69 या धावसंख्येवर तब्बल 5 खेळाडू बाद झाले.शेवटच्या 9 चेंडूवर नूर 11 संघास केवळ 4 धावांची भर टाकता आली. निर्धारित 8 षटकात नूर 11 संघ 73 धावा बनवू शकला. नूर 11 संघाकडून मुबारक याने सर्वोत्तम खेळी करत केवळ 10 चेंडूत चार उत्तुंग षटकार व एक चौकाराच्या सहाय्याने 29 धावा बनवल्या. मुबारक याने रिव्हर्स फटक्याचं वापर करून मारलेला षटकार लक्षवेधी ठरला.
हुसेन 11 संघाकडून सोनू शेख व अमीन बावासे यांनी प्रत्येकी 3, आफताब व नासिर शेख यांनी प्रत्येकी 1 बळी घेत संघास मोठया धावसंख्येपासून रोखण्यास यशस्वी ठरले.
स्पर्धेत जवळपास सर्व सामने अतिशय अटीतटीचे होत असल्याने मागील सर्व सामन्याचा आढावा घेता, 74 धावांचा लक्ष्य वाटते तितके सोपे नव्हते असे मानले जात होते. फलंदाजी करणे या कठीण खेळपट्टीवर अतिशय जिकरीचे काम वाटत होते. धावांचं पाठलाग करत असताना हुसेन 11 संघाची सुरुवात सुध्दा काहीशी अडखळतच झाली. आघाडीचा फलंदाज नासिर वैयक्तिक शून्य धावेवर बाद झाला. कर्णधार आमीन बावासे व आक्रमक फलंदाज सोनू शेख या दोघांनी 42 धावांची उपयुक्त भागीदारी करून सामन्यावर चांगली पकड मिळवली.पण क्षणात सामना नाट्यमय अवस्थेत येऊन पोहचला.
स्पर्धेत अतिशय भेदक मारा करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिस शेख याने आघाडीचे 3 बळी घेत सामना आपल्या बाजूने झुकवला होता. आघाडीची फळी बाद झाल्यावर अष्टपैलू आफताब मुल्ला वर पूर्ण जबाबदारी येऊन ठेपली. मात्र तजम्मूल शेख धावबाद झाल्यानंतर आफताबवर आणखीन दबाव वाढला. 12 चेंडूत 20 धावांची गरज असताना, पूर्ण स्पर्धेत फलंदाजीत अपयशी ठरलेल्या अजीम जमादारने अंतिम सामन्यात योग्य वेळी 7व्या षटकात 6 चेंडूत दोन षटकार व एक चौकार मारून 16 धावांची निर्णायक खेळी करत सामना आपल्या बाजूने वळवला. अजीमची ही खेळी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. शेवटच्या षटकात विजयासाठी 3 धावांची गरज आफताब ने पूर्ण केली. MPL चा अंतिम सामना हुसेन 11 या संघाने जिंकून चषकावर नाव कोरले.
हुसेन 11 कडून सोनू शेख याने सर्वाधिक 18चेंडूत तीन षटकार व एका चौकाराच्या मदतीने 32 धवांची तडाखेबंद खेळी केली. नूर 11 कडून अनिस शेख सर्वाधिक 3 बळी घेतले. फलंदाजीत 32 धावा व गोलंदाजीत 3 बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा सोनू शेख अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर सुद्धा सोनू शेखचं ठरला.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, म्हणून सर्वाधिक 12 बळी घेणारा नासिर शेख ठरला.
अंतिम सामना बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम बक्षीस दाते Mighty India उद्योग समूहचे प्रमुख जावेद बागवान, Whirlpool manager हाजीमलंग बागवान, प्रसिद्ध दागिने व्यापारी रेनॉन नादाल, दुसरे क्रमांक बक्षीसदाते समीर मकानदार, शब्बीर लंगडे,सलमान खडकाळे व सामना समिती अध्यक्ष जीलानी निरगुडे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमच्या सुरवातीस सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार झाले.मंचावरून बोलताना श्री हाजीमलंग बागवान यांनी आपल्या मनोगतात म्हणाले “इतक्या छोटयाशा गावात एवढी सुंदर स्पर्धा पाहून मी खूप अवाक झालो.क्रिकेट किती खोलवर गेलं आहे याची कल्पना मी केली नव्हती, आणि क्रिकेट हा खेळ खेड्यातदेखील खूप सुधारित अवस्थेत आहे याची प्रचिती आज मला आली.”
आदल्या दिवशी श्री जावेद बागवान यांनी स्पर्धेत धावती भेट दिली असता स्पर्धा प्रमुखांशी बोलताना म्हणाले की, पुढील वर्षी याहीपेक्षा भव्यदिव्य व अभूतपूर्व अशी स्पर्धा आपण आयोजित करू, त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करीन अशी ग्वाही दिली.
स्पर्धेचे पाहिले बक्षीस 21000रु.व चषक हुसेन 11 संघास,दुसरे बक्षीस 11000रु.व चषक नूर 11 संघास, व तिसरे बक्षीस 5000रु.व चषक शाहिद 11 संघास अनुक्रमे उद्योगपती जावेद बागवान,समीर मकानदार व SP construction चे मालक व सुप्रसिद्ध गायक अब्दुल मकानदार यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
सदर स्पर्धेस खालील क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्त्व सन्माननीय चेतनभैय्या मोरे कुरनुर, सैपन पठाण, सलमान खडकाळे, शब्बीर लंगडे,अझर आष्टेकर, हॉटेल लोकसेवाचे आक्रमभाई,आफताब हसन मुल्ला,उत्तम मोरे सर, सैपन शेख सोलापूर,नियामत उस्ताद मैंदर्गी व नेहमीच क्रिकेट साठी मदतीस तत्पर असणारे सलीम मुल्ला किणी,गुरुप्रसाद कन्स्ट्रक्शन चे प्रमुख बसवराज कल्याणी, स्टार ट्रेडर्स मैंदर्गी,SP साउंड सर्व्हिस चे मालक सलीम पठाण या सर्व मान्यवरांनी MPL क्रिकेट स्पर्धेस बक्षिसे व आर्थिक सहाय्य केले आहेत अशी माहिती अध्यक्ष जीलानी निरगुडे यांनी दिली व सर्वांचे आभार व्यक्त केले. MPL क्रिकेट स्पर्धेचे समालोचन,सूत्रसंचालन, बातमी लेखन श्री जकीउल्ला हिप्परगे यांनी केले. तर CKL youtube chanel चे प्रभारी कय्युम मुजावर व त्यांची टीम सामन्याचे थेट प्रक्षेपण केले. स्पर्धेत पंच एस. के. शफिक,वसीम नदाफ व गुणलेखक सिद्धाराम पुजारी यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोरगावचे ग्रामस्थ, क्रिकेटपटू महंमद दिवटे,इमरान दिवटे, सद्दाम मुजावर,युसुब पठाण,मुजीब पठाण,शकील मुजावर,गौस मुल्ला व समिती सदस्य सैपन दिवटे,आमीन बावाशे, बाबा शेख,महिबूब सातलगाव,राजू बागलकोटे यांनी अथक परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण कार्यक्रमास सर्व उपस्थितांचे श्री जकीउल्ला हिप्परगे यांनी आभार मानले.
