Akkalkot ; राजकीय जीवन प्रवासात समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद मोलाचे – आ.कल्याणशेट्टींची पहिली प्रतिक्रिया ; सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी घेतले सर्वप्रथम स्वामींचे दर्शन

अक्कलकोट (प्रतिनिधी): मी व माझे संपूर्ण कुटूंब स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आपल्या आज पर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे आशिर्वाद व तालुक्यातील जनतेचे प्रेम व शुभेच्छा आपणांस मोलाचे आहेत. या माध्यमातून आपणास भूतकाळात व वर्तमान काळात लाभलेलं आमदार पद हे तालुक्यातील विकासकामांची साखळी कायम करण्यासाठी मतदारांनी दिलेली अमूल्य संधी आहे. यामुळे आपण सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभारी आहोत असे सांगून स्वामी समर्थांचे आशीर्वाद व तालुक्यातील जनतेची आपल्यावरील निष्ठा या मुळेच आपणांस यंदाही विधानसभेच्या निवडणूकीत विजय संपादन होवून सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विधानसभेत पाठविले असल्याचे मनोगत अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे फेरनिर्वाचित आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या विजयानंतर प्रथम श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी बोलत होते. पुढे बोलताना कल्याणशेट्टी यांनी या विजयानंतर तालुक्यात आणखीन जोमाने कार्य करण्यास स्वामी समर्थांनी आपणांस आशिर्वाद द्यावे याकरीता समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी प्रथमेश इंगळे, भारतीय जनता पार्टीचे शहाजी पवार, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, बाळा शिंदे, राजू झिंगाडे, मनोज कल्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी, संतोष जमगे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सिध्दाराम कुंभार, संजय पवार, प्रसाद सोनार आदिसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
