गुढीपाडव्यापासून वागदरीत श्री परमेश्वर रथोत्सवाला प्रारंभ; पाच दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
वागदरी (ता. अक्कलकोट) : सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यांच्या वार्षिक यात्रेला यंदा १९ मार्च २०२६ पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ होत असून पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातून हजारो भाविक दरवर्षी उपस्थित राहतात.
नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वागदरी येथील श्री परमेश्वर यात्रेला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे भक्तांकडून दंड नमस्कार, श्रींच्या मूर्तीला रुद्राभिषेक, लहान रथ (उचई) सुवर्ण कळसारोहण तसेच सायंकाळी रथास जागा सोडविण्याचा कार्यक्रम आणि पालखी मिरवणूक असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
२२ मार्च रोजी ‘दोड्डमदलसी’ अर्थात रात्री गूळ-साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर २३ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस असून दुपारी २ वाजता रथास सुवर्ण कळसारोहण करण्यात येणार आहे. सायंकाळी भव्य रथोत्सव पार पडणार असून रात्री गोंधळींचे पौराणिक नाटक आणि कन्नड सामाजिक नाटक सादर करण्यात येणार आहे.
२४ मार्च रोजी सकाळी लहान मल्लांच्या कुस्त्या तर दुपारी ४ वाजता मोठ्या मल्लांच्या कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. रात्री ८ वाजता शोभेच्या दारुकामाने यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले आहे.
दरम्यान, श्री परमेश्वर देवस्थान येथे भव्य महाद्वार गोपूरम उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून रंगरंगोटी व इतर काही कामे बाकी आहेत. या कामासाठी भाविकांनी उदारहस्ते देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन परमेश्वर देवस्थान पंच कमिटीने केले आहे.
यात्रा कमिटीचे सिद्धाराम बटगेरी व नागप्पा घोळसगांव यांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!