गावगाथाठळक बातम्या

Pune Crime : मित्राला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये न नेता शाळेच्या मैदानावर टाकून धूम ठोकला

पुणे (प्रतिनिधी): दारु पिऊन मित्रासह मोटारसायकलवरुन घरी जात असताना कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला शाळेच्या मैदानात टाकून देऊन तो पळून गेला.

वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या मित्राचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मोटारसायकलचालक संतोष नागनाथ भिसे (वय २५, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा लक्ष्मण ससाणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील पुष्प मंगल कार्यालयासमोर २५ डिसेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजता घडला होता.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भिसे आणि कृष्णा ससाणे हे दोघे मित्र असून एकमेकांचे नातेवाईकही होते. २५ डिसेंबर रोजी ते दारु पित बसले होते. त्यानंतर पहाटे ते घरी जात होते. संतोष भिसे हा मोटारसायकल चालवत होता, तर कृष्णा ससाणे हा मागे बसला होता. पुष्प मंगल कार्यालयासमोर संतोष भिसे याने राँग साईडने जात असताना समोरुन येणार्‍या वॅगनर गाडीला धडक दिली. त्यामुळे मागे बसलेला कृष्णा ससाणे याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुला तसेच दोन्ही हाताचे कोपर्‍यावर, गुडघ्यावर, उजव्या पायाच्या पंज्यावर गंभीर जखमा झाल्या. त्याला उपचाराची गरज होती. असे असताना कोणालाही न कळविता चिंतामणी देशमुख उर्दू शाळेच्या मोकळ्या पटांगणात कृष्णा ससाणे याला ठेवून तो परस्पर निघून गेला. कृष्णा ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी सांगितले की, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हाला मैदानात मृतदेह मिळाला.

पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे दिसून आले.

त्याचा तपास केल्यानंतर मैदानात जो मृतदेह सापडला, ती व्यक्ती या अपघातात असल्याचे दिसून आले.

कृष्णा ससाणे याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे मोटारसायकलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button