*गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर*
रविदास जयंती विशेष

*गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर*
भुसावळ (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी केवळ एका जातीसाठी नाही तर जगातील संपूर्ण मानवतेसाठी काम केले, म्हणून त्यांना कोणत्याही एका जातीचे दैवत न समजता महामानव समजावे असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र दिपनगर भुसावळ येथील गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. यावेळेस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या प्रभावी भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी भक्तीचे नाही तर मानवमुक्तीचे काम केले. सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरोधात लढा दिला. रुढी परंपरा व अंधश्रध्देच्या विरोधात काम केले. जातीयता नष्ट करुन सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचे प्रयत्न केले, म्हणून त्यांना सर्व जाती धर्माचे शिष्य मिळाले होते. अनेक संत त्यांना आपले गुरु समजत होते, म्हणून त्यांची ओळख संतांचे संत, संत शिरोमणी जगत गुरु रविदास अशी झाली आहे.
*मंत्री संजय सावकारे यांना उद्देशून बोलतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी विनंती केली की, “महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन देशातील सर्व बुद्धिजीवी लोकांची एक व्यापक बैठक बोलावून गुरु रविदासांच्या नाव, चित्र, चरित्र आणि जन्मतारखेच्या बाबतीत एकवाक्यता घडऊन आणावी.” यानंतर मंत्रीमहोदयांनी आपल्या भाषणातून देशात आता जातपात राहिली नाही. गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येकांनी पुढे जावे, जातीपेक्षा कर्म श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.*
यावेळी नायब तहसीलदार श्रीमती शोभा घुले यांनीही आपले विचार मांडले. सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य अभियंता राजेश कुंभार, रविंद्र सोनकुसरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, अधिक्षक अभियंता रविंद्र डांगे, संतोष देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता महेश तांबे आदींची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास घोपे यांनी केले तर मोहित कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वश्री महेश तांबे, विक्रम अहिरे, प्रशांत वाघ, रामेश्वर तायडे, गोपाळ चिम आदींनी जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
