
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची दोन वर्षात बदली; मिळाली साखर आयुक्तपदाची जबाबदारी
अहिल्यानगर: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची अवघ्या दोन वर्षात बदली झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून सालीमठ यांच्याकडे राज्याच्या साखर आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. मात्र, सालीमठ यांच्या जागी नवीन नियुक्तीचे आदेश रात्री उशिरापर्यंत आले नव्हते. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सालीमठ नगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. त्या काळात अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले. मागील आठवड्यात १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.सिद्धाराम सालीमठ मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असले तरी राहुरी कृषी विद्यापीठातील उच्च शिक्षणाच्या निमित्ताने नगरशी जोडले होते. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात विविध योजनांमध्ये जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर होता.

तसेच प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही त्यांनी भर दिला. त्यामुळेच ई-ऑफिसच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर राहिला. गौणखनिज, ई-रेकॉर्डस, ई-क्युजेकोर्ट प्रणाली, जलदूतद्वारे टंचाई व्यवस्थापन, भूसंपादन आदीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यावर सालीमठ यांनी भर दिला. शासकीय यंत्रणेला जनतेच्या दारात नेण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात यशस्वी झाला.
