Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उद्या पुणे दौरा… वाहतूकीत बदल…
पुणे (प्रतिनिधी): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या शनिवार दि.२२) पुणे दौऱ्यावर पश्चिम विभागीय बैठकीसाठी येत आहेत. यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव या राज्याचे व्हीआयपीदेखील हजर राहणार आहेत.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वानवडी वाहतूक विभाग आणि बाणेर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले. वानवडी वाहतूक विभागांतर्गत पाण्याची टाकी सर्कल ते टर्फ क्लब रोडदरम्यान दुतर्फा वाहतूक शनिवारी (दि. २२) सुरू राहणार आहे.


बाणेर रोडवरील वाहतूक अशाप्रकारे वळवली जाणार..
१) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.

२) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.

३) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.
जड, अवजड वाहनांना बंदी…
१) पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक – पाषाण रोड
२) पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक – बाणेर रोड
३) पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल – औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.
जड वाहनांना शहरात २४ तास बंदी..
शनिवार (दि. २२) मध्यरात्री १२ ते रविवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना तसेच मिक्सर, डंपर, हायवा व स्लो मूव्हिंग (जेसीबी, रोड रोलर) वाहनांना सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे.