
कृत्रिम सृजनशीलता विरुद्ध मानवी सर्जनशीलता
मागील ५० वर्षातील तंत्रज्ञानातील प्रगती पाहिल्यास असे लक्षात येते की, हातातील घड्याळापासून , रेडिओ, दूरचित्रवाणी, संगणक व आताचे सर्वांच्या हातातील खेळणे बनलेले ‘स्मार्टफोन’ विकासाचा वेग दर्शवण्या साठी पुरेसे आहे . तंत्रज्ञान हे दर दहा वर्षांनी बदलत जात होते. नंतर या बदलाचा वेग तीन वर्षे , दोन वर्षे ,एक वर्ष…..असे करत ते आता दररोज बदलताना दिसत आहे. लहान मुलाच्या कानापाशी मनगटी घड्याळ लावून त्याची टिक् टिक् … ऐकवायास लावून,’ यात जीव आहे, रे! ‘ असं मामा आपल्या भाच्यास सांगत असे . परंतु आज लहान भाचा आपल्या मामाला मोबाईल मधील एखादी भयानक चित्रफित दाखवून घाबरवत आहे. आजच्या या सर्व गॅजेट्समुळे लहान बालकाला अकाली प्रौढपण येत आहे ; तर प्रौढ व्यक्तीला अकाली म्हातारपण येत आहे. या गॅजेट्स मुळे लहान मुलातील शहाणपणात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याच्यातील निरागसता, अल्लडपणा , बालक्रीडा व बाललीला नाहीशा झाल्या आहेत. प्रौढ व्यक्तीत या गॅजेट्समुळे स्मृतिभ्रंश, उदासीनता, निद्रानाश, थकवा , श्रवणशक्ती कमी होणे व एकाग्रतेचा अभाव होणे यासारखे वृद्धपकालीन आजार जडले जाऊ लागले आहेत.
भविष्याच्या पोटात नक्की काय दडले आहे हे आज आपण सांगू शकत नाही, परंतु या बदलाची दिशा मात्र आपल्याला आज दिसत आहे .येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स( A.I.)म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा असणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. मी जेव्हा चॅट जी.पी. टी. या आर्टिफिशियल इंटलिजन्सीच्या चॅट बॉटस् मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाची जागा घेईल का? ‘ हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने पुढील प्रमाणे उत्तर दिले –
‘ पुनरावृत्तीची आणि नियमित कामे (उदा. डेटा एन्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग) AI आणि ऑटोमेशनद्वारे त्वरित आणि कमी चुका करून केली जाऊ शकतात.काही सेवा क्षेत्रांमध्ये (उदा. ग्राहक सेवा ) चॅटबॉट्स, AI चा वापर वाढत राहील . पण पुढील ठिकाणी Al माणसाची जागा घेऊ शकणार नाही असे त्याने कबूल केले –
सर्जनशीलता, भावना आणि निर्णय घेण्याची जटिलता जिथे आवश्यक आहे.नेतृत्व, समाजातील संवेदनशील निर्णय, आणि माणसांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे, हे AI साठी कठीण आहे. अनेक क्षेत्रांमध्ये AI माणसांसोबत काम करेल. जसे की डॉक्टरांना निदान करण्यात मदत करणे, परंतु अंतिम निर्णय डॉक्टरच घेतील. शेवटी अंतिम निष्कर्ष त्याने असा दिला – AI काही नोकऱ्या बदलू शकते, परंतु नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. माणसांचे कौशल्य, विशेषत: सर्जनशीलता, समस्या सोडवणे आणि मानवी संबंध, याला नेहमीच महत्त्व असेल.’
‘ सर्जनशीलता ‘ म्हणजे नवीन कल्पना, संकल्पना सूचने होय. हे केवळ मानवी मेंदूतच शक्य आहे,हे A I ने देखील मान्य केले आहे. तर ‘सृजनशीलता ‘ म्हणजे एखादया कल्पने किंवा संकल्पनेनुसार नवीन निर्माण करणे होय. A I सर्जनशील नसला, तरी त्याची सृजनशीलता मानवी सृजनशीलते पेक्षा अनेक पटीने जास्त आहे.
सिनेमाची पटकथा लिहिणे, वृत्तपत्रासाठी बातमी लिहिणे, कथा,कादंबऱ्या व कविता लिहिणे यासारख्या गोष्टीतील रंजकता वाढवून मानवी मनाच्या हिंदोळ्यावर स्वार होण्याची किमया आर्टिफिशल इंटलिजन्सीच्या सृजनशीलते मुळे शक्य होऊ लागली आहे. आजच्या काळातील अनेक ‘useful’ लोकांना ‘useless’ करण्याचे काम A I करू लागला आहे .याचाच परिणाम म्हणून ‘इज धिस व्हॉट वुई वॉण्ट’ नावाचा संगीत अल्बम २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला,कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा व्यापार-वापर करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना आपले हात-पाय सहज पसरू दिल्याचे काय दुष्परिणाम होतील हे दाखवून, आपल्याला हे हवे आहे का? असा प्रश्न विचारणारा हा अल्बम आहे.मानवाची सर्जनशीलता आता अशी गंजत जाणार का?असा प्रश्न या अल्बम मधून ब्रिटिश संगीतकारांनी उपस्थित केला आहे .प्रश्न केवळ संगीतापुरता मर्यादित नाही, तर सर्वच कलांना असलेल्या ‘एआय’च्या धोक्याबाबतचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लेखक, चित्रकार, दृश्य कलाकार अशा सगळ्यांनीच या लढ्याला पाठिंबा दिला आहे. निषेधाचे हे वारे ब्रिटनमध्ये वाहत असले, तरी या प्रश्नाचे वादळ केवळ ब्रिटनपुरते मर्यादित राहणार नाही. मागील वर्षी मे महिन्यात अमेरिकेत झालेल्या चित्रपट-मालिका लेखकांनी वाढत्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरा विरुद्ध ११८ दिवस संप केला होता. चॅट-जीपीटीसारख्या सॉफ्टवेअरचा सर्रास वापर करून पटकथा लिहून घेऊ लागल्यास आपले अस्तित्वच धोक्यात येईल, हे जाणून संप पुकारण्यात आला होता . ‘द रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ चे साडेअकरा हजार सदस्य संपावर गेले होते .कृत्रिम बुद्धिमत्तेची सृजनशीलता विरुद्ध मानवी सर्जनशीलता असा थेट सामना होऊन पटकथेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर नियंत्रण आणले जाईल, असा करार करून हा संप मागे घेण्यात आला होता .ए.आय. मानवाच्या सर्जनशीलतेची जागा घेऊ पाहील, तर त्याला विरोध होत राहील… हे निश्चित आहे. AI ची कृत्रिम सृजनशीलताआणि माणसाची नैसर्गिक सर्जनशीलता यामधील संघर्ष पुढील काळात कोणते रूप धारण करणार, हे पाहणे तुम्हा आम्हा साठी उत्सुकतेचे राहणार आहे.
– किशोर जाधव,सोलापूर,
मो .नं.९९२२८८२५४१