संविधान साक्षर होणे काळाची गरज…
जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते.

जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली.लोकशाही प्रत्यक्षात आणण्यामध्ये संविधानाचा फार मोठा वाटा आहे.भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा,ऑक्सिजन देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे.संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे .तोच नेमका विचार आहे हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.
अलिकडे राजकारण हा बिनभांडवली गोरख धंदा झालेला आहे.अवैध संपत्ती जमविण्याचे ते मुक्त कुरणच आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिक स्वच्छ चारित्र्याच्या माणसांऐवजी काही असामाजिक तत्वाची, गुंड प्रवृत्तीची, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली माणसे येत आहेत. यासाठीच संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धोक्याचा इशारा दिला होता की, ‘संविधान चांगले की वाईट हे त्याचा वापर जे करतात, त्यांच्यावर अवलंबून आहे’ अलिकडे कायदयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे गुन्हेगार निर्दोष सुटतात. संविधानच कुचकामी आहे, अशी ओरड करुन ते बदलण्याचा प्रयत्न होत आहे. कोणताही राजकीय पक्ष असो त्याला संविधानाप्रमाणेच आपली वाटचाल करावी लागणार आहे. सर्व निवडणूक प्रक्रियेपासून सत्ता स्थापनेपर्यंत त्याला संविधानाच्या मार्गाने जावे लागणार आहे आणि सत्ता स्थापन केल्यावर किंवा विरोधी पक्षात बसल्यावरही त्यांना संविधानाला डावलताच येणार नाही.
भारतातल्या प्रत्येक नागरिकाने संविधान साक्षर व्हायला हवे. समाजातल्या तळातला अगदी शेवटचा घटकही संविधानाची जाण बाळगणारा असायला हवा. आपण साजरे करतो ते राष्ट्रीय सण कोणते आणि का, याची माहिती असायला हवी. संविधान म्हणजे काय? त्याची निर्मिती, घटनेने भारताच्या नागरिकास दिलेले हक्क, अधिकारांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपले संविधान आपल्याला सन्मानाने जगण्याच्या संधीबरोबरच समान संधीचीही मुभा देते, ज्यात जन्मावरून उच्च-निच, आर्थिक विषमतेने गरीब-श्रीमंत, लिंगाधारीत स्त्री-पुरुष, विषमतेला स्थान नाही आणि हे वास्तवात आणण्याचे आपले सर्वाचे म्हणजे नागरिकांचे आणि राजकर्त्यांचे कर्तव्य आहे. समतेसाठी आपण सर्वानी नैसर्गिक ऊर्मीने प्रघनशील राहावयास हवे. आपल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, देशात समतेचे राज्य अपेक्षित असेल, तर समता-बंधुतेच्या सहाय्याने अधिक नैसर्गिक आणि अधिक खोलवर प्रस्थापित होऊ शकते. म्हणून संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही अनमोल मूल्ये आहेत.
शालेय अभ्यासक्रमात संविधानाविषयी फारच कमी माहिती आढळते.प्रत्येक विदयार्थी आणि नागरीक यांना संविधानाची परिपूर्ण माहिती असली पाहिजे, कारण संविधान हा आपल्या देशाचा प्रमुख ग्रंथ आहे.

धोंडपा नंदे,वागदरी

