डॉ. रूपा निरोळी- कनका यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच. डी. पूर्ण करून जिंकली प्रतिजैविक प्रतिकारशक्ती विरूद्धची लढाई…..
पीएचडी प्रदान

डॉ. रूपा निरोळी- कनका यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच. डी. पूर्ण करून जिंकली प्रतिजैविक प्रतिकारशक्ती विरूद्धची लढाई…..
सोलापूर |

गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गी येथून सूक्ष्मजैवशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यातील वागदरी गावच्या डॉ. रूपा निरोळी-कनका यांनी प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (Antibiotic Resistance) या गंभीर जागतिक आरोग्य समस्येविरुद्ध संशोधन करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) व इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन यांच्या अहवालानुसार, 2050 पर्यंत प्रत्येक 10 मृत्यूंपैकी 1 मृत्यू AMR (Antimicrobial Resistance) मुळे होण्याची शक्यता आहे. भारत व दक्षिण आशिया यावर याचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे.

हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन डॉ. रूपा यांनी प्रतिजैविक प्रतिकारशक्ती या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गुलबर्गा विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात प्रो. वंदना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.साठी २०२० मध्ये नाव नोंदवले. संशोधनाच्या दरम्यान विविध माशांचे नमुने गोळा करून त्यामधून सूक्ष्मजीव वेगळे केले व त्यांची विविध प्रतिजैविकांप्रती प्रतिकारशक्ती तपासली.

या संशोधनावर आधारित चार शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय समिक्षित शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी यशस्वीपणे वायवा पार पाडत पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

डॉ. रूपा यांच्या मते, सहज उपलब्ध असलेल्या प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर ही प्रतिकारशक्ती वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे. त्यांच्या संशोधनाद्वारे जनतेत जागरूकता निर्माण करून जबाबदारीने औषधांचा वापर करण्याचा संदेश दिला जात आहे.
डॉ. रूपा सध्या संजिवनी ज्युनिअर कॉलेज, मुंबई येथे जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.एस्सी., एम.फिल., बी.एड. व सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच.डी. पूर्ण केली असून त्यांना १० वर्षांचा अध्यापन व संशोधनाचा अनुभव आहे.
त्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावच्या असून जेष्ठ विचारवंत मलप्पा निरोळी यांची कन्या आहेत. आपल्या या यशाचे श्रेय ते आपले गाईड, आई, वडील, पती नागराज व या पूर्ण प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देतात. त्यांच्या या यशाबद्दल वागदरी व परिसरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.