सोलापुरातील उद्योजकांचा मंगळवारपासून दुबई दौरा आ. सुभाष देशमुखांच्या प्रयत्नातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा प्रयत्न
उद्योग धंदे

सोलापुरातील उद्योजकांचा मंगळवारपासून दुबई दौरा
आ. सुभाष देशमुखांच्या प्रयत्नातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवण्याचा प्रयत्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात तयार होणारे अतिशय दर्जेदार युनिफॉर्म, उच्च प्रतींचे टॉवेल, नावीन्यपूर्ण बॅग, विविध पदार्थांची लज्जत वाढवणारे स्वादिष्ट मसाले व अन्य पदार्थांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आ. सुभाष देशमुख प्रयत्नशील आहेत. त्याअंतर्गतच संबंधित वस्तू उत्पादकांच्या 18 उद्योजकांसह स्वतः आ. देशमुख हे मंगळवार ता. 6 ते रविवार ता. 11 या दरम्यान दुबई दौरा करत आहेत. अस्सल सोलापुरी उत्पादनाचे मार्केटिंग करत या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत उठाव व्हावा यासाठी आ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे उद्योजकीय शिष्टमंडळ प्रयत्न करणार आहे.

याविषयी आ. सुभाष देशमुख तपशीलवार माहिती देताना म्हणाले, दुबईच्या दौर्यात तेथील प्रगती पाहून मी थक्क झालो. वाळवंटी भागात स्वतःचे असे काही विशेष उत्पादन, खासियत नाही. तरीही तेथील मार्केट जागतिक दर्जाचे बनले आहे. अशा जागतिक मार्केटमध्ये अस्सल सोलापुरी, नावीन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने विक्रीस उपलब्ध केली तर स्थानिक उद्योजकांना मोठ्याप्रमाणावर अर्थप्राप्ती होईल, कामगारांनाही फायदा होईल असा विचार मनामध्ये आला तो विचार मी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांसमोर व्यक्त केला. त्यामध्ये युनिफॉर्म तयार करणारे सहा उद्योजक, बॅग उत्पादक एक, टॉवेल उत्पादक तीन, अन्नधान्य व मसाले उत्पादक तीन यासह विविध उत्पादनांच्या निर्मात्यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या या कल्पनेस सकारात्मक प्रतिसाद दिला. यासर्वांचे मिळून सोलापूरच्या उत्पादकांचे दुबईसाठी म्हणून व्यापार मंडळ आम्ही निर्माण केले. त्यातूनच मंगळवार ता. 6 एप्रिलपासून या सर्व उद्योजकांसह मी स्वतः दुबई दौरा करत आहे. सोलापुरात तयार झालेल्या उत्पादनांना जागतिक बाजार पेठेत स्थान मिळवून देण्यासाठी, तेथून परदेशी चलन मिळवण्यासाठी, त्यातून सोलापुरातील उद्योजक, कामगारांच्या जीवनात अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत.
—
चौकट
—
दुबई दौर्यातील कामांचा तपशील
– दुबईमधील मोठे शोरूम्स आणि वितरकांसोबत मिटींग्ज घेणे
– तेथील विविध उत्पादनांच्या कारखान्यांचा अभ्यासदौरा करणे
– दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासातील उच्च अधिकार्यांच्या गाठीभेटी
– मूळ भारतीय असलेले परंतु दुबईत मसाला किंग उपाधीने सुप्रसिद्ध असलेले उद्योजक धनंजय दातार यांच्यासोबत विशेष बैठक
—
चौकट
—
सोलापूर विद्यापीठाची यांची मदत
सोलापूर सोशल फाउंडेशनमार्फत सुरू असलेल्या या उपक्रमास व सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असलेले ‘पीएएचएसयूआय’ फाउंडेशन मुख्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. याअंतर्गत सोलापूरची दुबईतील व्यापार-उद्योजकीय भूमिका स्पष्ट करणे, दुबई आणि सोलापुरातील उद्योजक-व्यापार्यांत समन्वय राखणे यासह विविध कामात सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमात मोलाची भूमिका बजावत असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.
—
चौकट
—
दुबई दौर्याची ही आहेत उद्दिष्टे….
– अस्सल सोलापुरी मालास दुबईच्या जगविख्यात मार्केटमध्ये निर्यातीच्या संधी शोधणे
– दुबईमधील व्यावसायिकांची सोलापूरच्या उद्योगांमध्ये भागीदारी मिळवणे
– जागतिक बाजारात खरेदी-विक्रीस कोणत्या प्रकारचा माल लागतो हे समजून घेणे
– सोलापूर-दुबई बिझनेस फोरम तयार करणे
– दुबई भेटीनंतर स्थापन होणारे सोलापूर-दुबई बिझनेस फोरम संस्थात्मक रूपात पुढे नेणे, आणि स्टार्टअप्स, ग्रामीण उद्योजक यांना दीर्घकालीन लाभ पोहोचवणे
– राजकीय इच्छाशक्ती, सोलापुरातील उद्योजकांची ऊर्जा, संस्था-समन्वयाचा संगम यातून सोलापूरला जागतिक निर्यातदार महानगर करण्याचा सोलापूर सोशल फाउंडेशनाचा उद्देश.
