जुन्या आठवणींना मिळाला उजाळा ” अनंत चैतन्य प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न-
माजी विद्यार्थी मेळावा

“जुन्या आठवणींना मिळाला
उजाळा “
अनंत चैतन्य प्रशालेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न-
—————————————-शाळेतील मस्ती,एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम , जुने मित्र त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गंमतीदार किस्से,शिक्षण घेताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, शालेय जीवनात झालेली भांडणे, रुसवे,फूगवे या साऱ्या जुन्या आठवणीत ‘ते’ रमले निमित्त होते . महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे .
या सोहळ्यासाठी २००३मध्ये इ. १० वीत शिकणारे माजी विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनी एकत्रित आले होते. यावेळी आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांना व जुन्या मित्रांना पाहताच या माजी विद्यार्थ्यांचे ऊर भरून आले. विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपल्या शाळेविषयी असणारी आस्था, कृतज्ञतेचा भाव , आठवणी या नेहमी मनात घर करून असतात याचा प्रत्यय आजच्या या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात आला. विविध शहरातून व भागातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले २२ मुले व १५ मुली असे एकूण ३७ माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सर्वप्रथम या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष व आ. सचिनदादा कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व
त्यांना शिकवलेल्या सर्व गुरुजनांचे, औक्षण करुन गुलाबपुष्पांची उधळण करत स्वागत केले.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी व विद्यादेवी सरस्वती मातेचे पुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.यानंतर प्रशालेचे दिवगंत माजी विद्यार्थी व शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर उपस्थित सर्व प्रशालेचे माजी विद्यार्थी,गुरु जनांचे व मान्यवरांचे माजी विद्यार्थी नितीन शेवाळकर यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले.यानंतर संस्थेचे अध्यक्ष व आ. सचिनदादा कल्याणशेट्टी , सरपंच सौ. सोनालीताई तळवार, संस्थेचे संचालक श्री. शिवप्पा भरमशेट्टी, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री.सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, सर्व आजी माजी शिक्षक – शिक्षिका व समस्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे फेटा, शाल, श्रीफल व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेची माजी विद्यार्थिनी भारती भरमशेट्टी, तायव्वा स्वामी व विद्यार्थी नितीन निक्ते यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील आठवणीना उजाळा देत आपल्या जडणघडणीत असलेला शिक्षकांचा व शाळेचा असलेला अनमोल वाटा किती महत्वाचे आहे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यानंतर प्रशालेचे माजी शिक्षक श्री. बसवराज बंडगर, श्री. बापूजी निंबाळकर यांनी स्नेहमेळाव्याच्या आयोजनाविषयी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उत्तम आरोग्यासह सुखमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला संगणक संच भेटस्वरुपात देण्यात आले. याविषयी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे सर यांनी आभार व्यक्त केले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष व आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी आजच्या या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी, वर्गमित्रांची ज्या-ज्यावेळी बाहेर भेट घडते त्या-त्यावेळी आनंद हा होतोच मात्र आज आपण सर्वजण शाळेत एकत्रितपणे भेटलो याचा आनंद हा अनोखा व खुप आहे.असे प्रतिपादन करत या तालुक्याचा आमदार म्हणून नव्हे तर आपला भाऊ म्हणून आपण मला आपल्या सुखदुःखात सहभागी करून घ्या. संवादाने अनेक गोष्टींचा उलगडा होतो.असे सांगत मी सदैव आपल्या सोबत आहे असे आश्वासित करत कार्यक्रमाच्या स्नेहभोजनासह केलेल्या उत्तम व सुनियोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचा माजी विद्यार्थी व कार्यरत प्रा. काशीनाथ पाटील यांनी तर सुत्रसंचालन सिद्धाराम हेगडे यांनी तर आभार नितीन निक्ते यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी श्री. सिद्धाराम हेगडे, नितीन निक्ते, काशीनाथ पाटील, सिद्धारुढ कोरे, मडोळप्पा कल्याणशेट्टी, नितीन शेवाळकर,अमोगसिद्ध व्हनमाने, संतोष घोडके,संंजय पारतनाळे, कविता पारतनाळे,मुक्ताबाई होनाजे यांनी विशेष परिश्रम घेतले.
