*तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांची निवड*
निवड नियुक्ती

*तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांची निवड*
पुणे : संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन, पुणे आयोजित तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन २०२५ अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थाची बैठक संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक श्री सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीत संत चोखामेळा महाराज व परिवारातील संताच्या साहित्याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात चर्चा होऊन तीर्थक्षेत्र नरसी नामदेव जि.हिंगोली या ठिकाणी हे साहित्य संमेलन घेण्याचे नियोजित करण्यात आले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संत साहित्याचे अभ्यासक ,साहित्यिक , प्रेरणादायी वक्ते ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये हे मागील वीस वर्षापासून आपल्या कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून गावोगावी वारकरी संप्रदायाची मूळ विचारधारा रुजवण्याचे महत्कार्य करत आहेत. त्याचबरोबर मागील चार-पाच वर्षांपासून आपल्या सडेतोड लेखनाच्या द्वारे भक्ती, शक्ती, ज्ञान आणि त्यागाचा फार मोठा वसा असणारा संत विचार अनुषंगाने ते महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने लेखन करत आहेत. तसेच नुकतीच त्यांची संत तुकोबांच्या अभंगाचे विवेचन करणारी “तुकाराम नीती” आणि “सांगाती तुकोबा” हे दोन ग्रंथ प्रकाशित झाले असून या दोन्ही ग्रंथांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्या अनुषंगाने सर्वानुमते डॉ.विठ्ठल जायभाये जे हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, तेंव्हा त्यांची निवड योग्य असल्याचे ठरले.
“संत चोखामेळा महाराज परिवार व संत नामदेव अनुबंध” असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले हे दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंत कवी, लेखक, व्याख्याते, प्रबोधनकार, कीर्तनकार आदींच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र नरसी नामदेव येथे शनिवार ४ व रविवार ५ ओक्टोबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन सत्र व संत साहित्याचे देखावे आणि कीर्तन इत्यादी कार्यक्रम असणार आहेत. संमेलनाध्यक्ष निवड समितीच्या प्रा.अलका सपकाळ, प्राचार्य डाॅ.राजेंद्र थोरात यांनी काम पाहिले. या प्रसंगी आशिष यादव, प्रा.आशा राऊत, प्रा.देवीदास बिनवडे , ह.भ.प.श्री बाबूराव महाराज तांदळे , धोंडप्पा नंदे, विजयराव जगदाळे, हरीश भोसले, लक्ष्मणराव चिलवंत, भिमा जाधव , अमोल निकाळजे , दत्ताभाऊ वाघमारे आदी उपस्थित होते.
