प्रकाश मंगाणे यांना ‘रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती’ क्षेत्रातील कार्यासाठी विशेष पुरस्कार
पुणे, प्रतिनिधी –
बालगंधर्व रंगभूमी मंचाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भरवण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात युथ आयकॉन उद्योजक प्रकाश मंगाणे यांना “रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती” या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
या विशेष सोहळ्यात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले, सहस्त्र प्रोडक्शनच्या प्रमुख अध्यक्षा डॉ. माधवी व्यवहारे आणि डॉ. मुकुंद व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश मंगाणे यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना प्रकाश मंगाणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हा सन्मान केवळ माझा नसून, तो आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सामाजिक बांधिलकीचा परिपाक आहे. हा गौरव मला सामाजिक कार्यात अधिक जोमाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा आणि बळ देणारा आहे.”
रोजगार निर्मिती आणि ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्याच्या कार्यात मंगाणे यांचे योगदान गेल्या काही वर्षांत विशेषत्वाने अधोरेखित झाले आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांतून तरुणांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उद्योगासाठी संधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करत, युवा पिढीसाठी ते एक आदर्श ठरत असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या सांगतेस मंगाणे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, “समाजातील बेरोजगारीचे संकट दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनविण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”
या सन्मानानंतर प्रकाश मंगाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!