“शेअर मार्केट: समजून उमजून गुंतवणुकीकडे पहिले पाऊल!”
(गावगाथा विशेष भाग १)
आपल्यापैकी अनेकांनी शेअर मार्केटपासून सुरुवातीला चार हात लांबच राहणे पसंत केले. काही जणांनी हिम्मत दाखवत थेट ट्रेडिंग करायलाही सुरुवात केली, पण बहुतेक वेळा योग्य माहिती, अनुभव आणि कौशल्याच्या अभावामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. परिणामी अशा निराश झालेल्या अनेकांनी शेअर मार्केट म्हणजे “जुगाराचा अड्डा” असा निष्कर्ष काढला. परंतु हा समज चुकीचा आहे आणि त्याच गैरसमजाला दूर करण्यासाठीच ही लेखमालिका लिहिली जात आहे.
एका जागतिक आकडेवारीनुसार, ८० ते ९० टक्के नवखे ट्रेडर्स एका वर्षाच्या आत ट्रेडिंग सोडून देतात. राहिलेल्या १०-२० टक्के ट्रेडर्समध्येही अनेकजण “स्टॉपलॉस” पाळू न शकल्याने दुसऱ्या वर्षात मार्केटमधून बाहेर पडतात. अशाप्रकारे दरवर्षी नव्या नवख्या रिटेल गुंतवणूकदारांची भर मार्केटमध्ये पडत राहते, पण टिकाव लागत नाही, यामागचं प्रमुख कारण म्हणजे अनुशासनाचा आणि संयमाचा अभाव.
गुंतवणुकीची खरी सुरुवात कुठून करावी?
आजवरच्या जीवनशैलीत आपल्याला “पैसा कमवा, आणि साठवा” हे शिकवलं गेलं. पण त्या साठवलेल्या पैशाचं व्यवस्थापन, योग्य गुंतवणूक, त्यातून उत्पन्न मिळवणं आणि पैसा वाढवणं याचा विचार कोणी शिकवलं नाही.
या लेखमालिकेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की:
शेअर मार्केटमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करावी
बाजाराच्या चढउतारांचा सामना कसा करायचा
फसव्या सल्लागारांपासून स्वतःला कसं वाचवायचं
बँक FD किंवा PF पेक्षा चांगला परतावा कसा मिळवता येईल
गुंतवणुकीसाठी योग्य रक्कम कोणती?
सर्वप्रथम लक्षात ठेवा की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ती रक्कम कधीही कर्ज काढून किंवा उसनं घेतलेली नसावी.
तसंच ती रक्कम तुमच्या दैनंदिन खर्च, तातडीच्या गरजा किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडथळा आणणारी नसावी.
जिचा आपल्याला तात्काळ उपयोग नाही आणि जी दीर्घकाळासाठी गुंतवून ठेवू शकता अशीच रक्कम शेअर मार्केटमध्ये वापरावी.
यात संयम फार महत्त्वाचा असतो. योग्य वेळ कधी काही दिवसांत येईल, कधी काही महिन्यांत किंवा वर्षांनंतर — पण योग्य ज्ञान व मानसिक तयारी असेल तर त्याचा फायदा नक्कीच होतो.
सोशल मिडियावरील फसवे ‘गुरू’ आणि दिशाभूल
आजकाल सोशल मीडियावर अनेक चॅनेल्स आणि सेल्फ proclaimed मार्केट गुरू एका दिवसात हजारो रुपये कमावल्याचे दाखवतात. त्यांचे थंबनेल्स, आकर्षक मथळे, झगमगती यशोगाथा — या सर्वांचा एकच उद्देश असतो : तुमचं लक्ष वेधणं!
पण वस्तुस्थिती अशी असते की:
या यशामागे वर्षानुवर्षांचा अनुभव आणि अभ्यास असतो
त्यांनी घेतलेला जोखमीचा दर आणि रिस्क मॅनेजमेंट हे आपण पाहत नाही
त्यांच्या ‘टिप्स’ फॉलो करताना अनेक नवखे गुंतवणूकदार मोठं नुकसान सहन करतात
म्हणूनच कोणत्याही टिप्सवर अंधविश्वास न ठेवता स्वतः अभ्यास करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
अभ्यास – तुमचा पहिला आणि सर्वोत्तम गुंतवणूक
शेअर मार्केटमध्ये १ रुपयाही गुंतवण्यापूर्वी ज्ञानार्जनासाठी गुंतवणूक करा.
काय करावं?
सुरुवातीला बाजारातील Basic गुंतवणूक मार्गदर्शक पुस्तके विकत घ्या
एखाद्या विश्वासार्ह आणि अनुभवी संस्थेकडून प्रमाणित कोर्स करा
बाजारातील तंत्र (Technical Analysis), मूलभूत माहिती (Fundamentals) यांचा अभ्यास करा
रोज मार्केटचा नियमित अभ्यास आणि निरीक्षण करा
शाळा-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष जीवनात फारसा उपयोग होत नाही, पण शेअर मार्केटसारख्या जीवनोपयोगी कौशल्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडू शकतं.
शेवटचं पण महत्त्वाचं
शेअर मार्केट हे नशीबावर चालणारं नाही, हे “युद्ध” आहे आणि त्यासाठी तयारी, शिक्षण, संयम आणि शिस्त लागते
बाजारात रोज हजारो संधी येतात, पण त्याचा सोने करण्यासाठीची तयारी हवी
गुंतवणूक ही एक कला आणि विज्ञानाचा संगम आहे — जितका अभ्यास कराल तितका आत्मविश्वास वाढेल..
लेखमालिकेचा उद्देश स्पष्ट आहे — “गैरसमज, गोंधळ आणि गैरवर्तन बाजूला ठेवून, माहितीपूर्ण आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाटचाल!”
जर हाच हेतू तुम्हालाही जवळचा वाटत असेल, तर पुढच्या भागात नक्की भेटूया!
संगमनाथ खराडे,
वागदरी/पुणे ( शेअरबाजार -सल्लागार)
संपर्क — 72619 34510
Back to top button
×
No WhatsApp Number Found!