मुंबईत दहिहंडी उत्सवाला गालबोट ; दोन गोविंदांचा मृत्यू, तर अनेक जण…

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत दिवसभर सुरू असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. या उत्सवात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. याची आकडेवारी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचे जगमोहन शिवकिरण चौधरी असं नाव आहे. तर गावदेवी गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. रोहन वाळवी असं या गोविंदाचं नाव आहे. तर ७५ गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आली. दिवसभरात जखमी झालेल्या गोविंदाना केईएम, नायर, सायन, शताब्दी, जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, ३२ गोविंदांवर उपचार सुरू आहेत, तर ४३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

दरम्यान, आतापर्यंत नऊ थरांचा विक्रम नोंदवण्यात आल्याने यंदा तो विक्रम मोडला जाणार का, याची सर्वांनाच उत्सुकता होती. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथे काही वर्षांपूर्वी नऊ थरांच्या विश्वविक्रमाची नोंद झाली होती. त्यानंतर आता १० थरांचा विक्रमही याच दहीहंडी सोहळ्यात जोगेश्वरीच्या कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने रचला आणि २५ लाखांचे बक्षीस मिळवले.
