अक्कलकोटचे विक्रमवीर डॉ. धानया कौन्टगी यांना पीएच.डी. पदवी; सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते सत्कार…
अक्कलकोट – इंग्रजी विषयात तब्बल ७९ वेळा नेट, सेट, गेट आणि पेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा अद्वितीय विक्रम प्रस्थापित करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झालेल्या अक्कलकोट येथील विक्रमवीर डॉ. धानया गुरूलिंगय्या कौन्टगी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

या संशोधन कार्यासाठी डॉ. कौन्टगी यांना डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. तानाजी कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मौखिक परीक्षेसाठी डॉ. मुस्तजीब खान (बहिस्थ परीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), डॉ. दीपक ननवरे (अध्यक्ष, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर) तसेच प्रा. प्रकाश सुरवसे उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाशजी महानवर यांच्या शुभहस्ते डॉ. कौन्टगी यांना पीएच.डी.चे नोटिफिकेशन प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी त्यांचा सहकुटुंब सन्मानपूर्वक सत्कार केला.
सध्या डॉ. कौन्टगी हे अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत मेहनत, चिकाटी आणि कष्ट यांच्या जोरावर त्यांनी ही पदवी संपादन केली. त्यांच्या यशामागे आई-वडील, पत्नी सौ. संगीताताई, चिरंजीव समर्थ व कन्या शांतलक्ष्मी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. कौन्टगी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!