गावगाथा

अभिमानाचा क्षण – सिद्धाराम लक्ष्मण गवळी यांचे यश

यशोगाथा

अभिमानाचा क्षण – सिद्धाराम लक्ष्मण गवळी यांचे यश
अक्कलकोट तालुक्यातील सदलापूर गावचे सुपुत्र सिद्धाराम लक्ष्मण गवळी यांनी आपल्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील आणखी एक महत्वाची शिखर पायरी गाठली आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले गवळी साहेब नुकतेच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन खात्याअंतर्गत पदोन्नती मिळवत मुंबई रेल्वे विभागात पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर रुजू झाले आहेत. हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित नसून, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, गावकऱ्यांसाठी आणि संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरले आहे.
जिद्दीचा प्रवास….सिद्धाराम गवळी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले असूनही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण वागदरी येथील श्री शेळके प्रशालेत झाले. सन 1988 साली त्यांनी इयत्ता 10 वी उत्तीर्ण केली. आर्थिक व सामाजिक अडचणींचा डोंगर असतानाही त्यांनी हार मानली नाही. चिकाटी, ध्येयवेड आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण करून पोलिस सेवेत दाखल होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले.
पोलिस सेवेत दाखल…..सन 1992 मध्ये पोलिस भरती होऊन त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकतेने आणि मेहनतीने त्यांनी गुन्हे शाखेत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. गुन्हेगारीविरोधी कामगिरी, प्रामाणिकपणा आणि संवेदनशील स्वभाव यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये तसेच वरिष्ठांमध्येही लोकप्रिय झाले.
कुटुंबाची शान…..सिद्धाराम गवळी यांचे वडील शेतकरी असून साध्या कुटुंबातून त्यांनी मोठी प्रगती साधली आहे. त्यांचे धाकटे बंधू देखील मुंबई पोलिस खात्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. अशा प्रकारे गवळी कुटुंबाने पोलिस क्षेत्रात गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये….गवळी साहेब हे अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. कोणतेही काम जबाबदारीने आणि प्रामाणिकतेने पार पाडणे ही त्यांची खासियत आहे. सहकाऱ्यांना मदत करणारे, लोकांच्या अडचणी समजून घेणारे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी लोकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
गौरवाचा क्षण…..मुंबई रेल्वे विभागात PSI पदावर नुकतीच झालेली त्यांची नियुक्ती हा त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मिळालेला योग्य सन्मान आहे. त्यांच्या या यशामुळे सदलापूर गाव, वागदरी शाळा आणि संपूर्ण अक्कलकोट तालुका अभिमानाने उंचावला आहे.
सिद्धाराम लक्ष्मण गवळी यांच्या या यशस्वी प्रवासातून युवकांना प्रेरणा घेण्यासारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनत, जिद्द आणि चिकाटीने कुठलेही स्वप्न साकार करता येते, याचे ते उत्तम उदाहरण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button