गावगाथा
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी व नुकसानीची पाहणी
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे त्वरित करण्याचे आदेश

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी व नुकसानीची पाहणी
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे त्वरित करण्याचे आदेश
पालकमंत्री यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला व राज्य शासन या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही
सोलापूर, दि. १८ (जिमाका) : जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अनुक्रमे २ व सर्वच १० महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर, तोगराळी व कुंभारी तसेच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी, शिरशी, बोरगाव, बादोले, रामपूर, साफळे, व किणी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पाहणी केली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व त्याबाबतचा अहवाल शासनाला त्वरित सादर करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
यावेळी शेतकरी, नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला व अशा आपत्तीच्या काळात राज्य शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथील पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने माहिती देऊन दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात झालेल्या शेती पिकांचे रस्त्यांचे व अन्य बाबींच्या नुकसानीची माहिती पालकमंत्री महोदय यांना दिली.
यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तहसीलदार विनायक मगर यांच्यासह सर्व संबंधित गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
*********