अतिवृष्टी झालेल्या ठिकाणचे प्रशासनाने पंचनामे अधिक गतीने करून अहवाल शासनाला सादर करावा
– पालकमंत्री जयकुमार गोरे
*ज्या ठिकाणी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणचे 100टक्के पंचनामे करावेत, यात कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही
*यापूर्वी जवळपास सर्व शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली आहे, पुन्हा ई-केवायसी साठी पंचनामे अहवाल थांबवू नका
*प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवून पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत
*सोलापूर महापालिकेने शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत व पुन्हा अशा अडचणी येणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात
सोलापूर, दिनांक 18(जिमाका):- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून, 91 महसुली मंडळापैकी 43 महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. तसेच उजनी व सीना नदी मधून पाणी सोडल्याने अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, घरांचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही नुकसान झालेले आहे. तरी प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने तसेच 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला ठिकाणचे 100 टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश राज्याचे ग्राम विकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर, यांच्यासह प्रांताधिकारी व सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. प्रशासकीय यंत्रणेने त्वरित पंचनामे करावेत. एकही शेतकरी व नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणचे सरसकट पंचनामे करावेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही. अशा ठिकाणचे पंचनामे राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रांताधिकारी यांची राहील, असेही त्यांनी निर्देशित केले.
तसेच पंचनामे करत असताना शेतकऱ्यांची पुन्हा ई केवायसी करण्याची आवश्यकता नाही, यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी तसेच अन्य शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांचे ई- केवायसी झालेली आहे. त्याच बँक खात्यावर शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाईची रक्कम मिळेल यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी दक्षता घ्यावी. ई -केवायसी अभावी पंचनामेचा अहवाल पाठवण्यास दिरंगाई करू नये, असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सुचित केले. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अधिनस्त रस्त्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. यंत्रणांनी जे शक्य आहे ते लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना शासनाकडून लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचित केले.
सोलापूर शहरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत. तसेच शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरात पाणी जाऊन जे नुकसान झाले अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही या दृष्टीने सर्व कारणांचा सविस्तर शोध घ्यावा व त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवाव्यात असेही निर्देश पालकमंत्री गोरे यांनी महापालिका यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू असलेल्या पंचनामे च माहिती दिली. तसेच सर्व स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला वेगाने पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याची माहिती दिली. महापालिका आयुक्त श्री. ओंबासे यांनी शहरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची कार्यवाही पूर्ण होत आल्याचे सांगून या अनुषंगाने कायमस्वरूपी उपाययोजनाबाबतही सविस्तर प्रस्ताव लवकरच दिला जाईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जंगम यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीने झालेल्या रस्ते, शासकीय इमारती, शाळा इमारत याबाबतचे पंचनामे करून अहवाल लवकरच सादर केला जाईल असे सांगितले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी माहे जून ते आज रोजी पर्यंत वार्षिक सरासरीच्या 95.95 टक्के पाऊस झाल्याची माहिती दिली. तसेच एक ते 18 सप्टेंबर 2025 या कालावधीत 91 महसुली मंडळापैकी 43 महसुली मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक म्हणजेच अतिवृष्टी झाल्याचे सांगून 448 गावे बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले. या कालावधीत करमाळा तालुक्यातील श्रीमती शांताबाई वाघ या मयत झालेल्या होत्या, त्यांच्या नातेवाईक यांच्या थेट बँक खात्यात शासकीय मदत जमा केल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच यामध्ये मयत जनावरे 28, मयत कोंबड्या 15 हजार 25 तर 276 घरांची परझड तर मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 86 हजार इतकी असून अतिवृष्टी व पुरामुळे 3 हजार 434 नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाल्याची माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी महसूल चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
**********
Back to top button
×
No WhatsApp Number Found!