गावगाथा

ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या वैभवासाठी करा! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात!

ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या वैभवासाठी करा!
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात!
सोलापूर, दि. १८- ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आज विद्यार्थ्यांनी पदवी व पदविकेच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग हा राष्ट्राच्या वैभवासाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेराया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. यामध्ये विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभेचे सदस्य तसेच पदवी घेणारे स्नातक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एकूण 10 हजार 955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 89 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अथक प्रवासातून पदवी मिळवणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक टप्पा आहे. मिळवलेल्या पदवीचा केवळ नोकरीसाठी उपयोग न करता त्याचा समाज व देशाच्या वैभवासाठी होणे महत्त्वाचे आहे. ज्ञान हीच फार मोठी संपत्ती आहे. त्या बळावरच आपण आपल्या राष्ट्राचे नाव उंचावू शकतो. त्यासाठी संशोधनास प्रोत्साहन देण्याबरोबरच संशोधन अधिकाधिक करून नवीन ज्ञान मिळवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात महाविद्यालयीन शिक्षकांची भरती ही लवकरच सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मुगेराया म्हणाले की, शिक्षण अशी एक गोष्ट आहे की, ती जीवन बदलून टाकते. शिक्षणाच्या जोरावरच आपण प्रगती साधू शकतो. त्यामुळेच तब्बल 33 वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशात झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. आज विद्यार्थ्यांनी कौशल्य व व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आज पारंपरिक शिक्षण देण्याबरोबरच कौशल्य व व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन रोजगारक्षम पिढी निर्माण करीत आहे. एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देऊन सोलापूरचे स्थलांतर थांबवले आहे. याचबरोबर विद्यापीठाने पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करून आतापर्यंत सव्वा लाख वृक्ष लावली आहेत. समाज आणि शिक्षण क्षेत्राचे नाते दृढ करण्यासाठी काही गावे दत्तक घेऊन तेथेही काम विद्यापीठाने सुरू केले आहे. विकसित विद्यापीठाचा संकल्प करून समाज उन्नतीसाठी विद्यापीठाने विविध प्रयोग राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ यांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्याची विनंती केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करत असल्याची घोषणा केली.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button