गावगाथा विशेष
सोलापूरच्या ‘रीलस्टार’ची ‘रिअल लव्हस्टोरी’ आता पडद्यावर!
आकाश – अंजली यांच्या संघर्षमय प्रेमकथेवर आधारित ‘लव्ह यू मुद्धु’ कन्नड चित्रपट प्रदर्शित
सोलापूर :सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सोलापूरच्या आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे या युवा दाम्पत्याची ‘रिअल लव्हस्टोरी’ आजपासून रुपेरी पडद्यावर झळकली आहे. ‘लव्ह यू मुद्धु’ या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याची सत्यकथा प्रेक्षकांसमोर आली असून, कर्नाटकासह महाराष्ट्राच्या सीमाभागात या चित्रपटाने रसिकांच्या उत्सुकतेचा कळस गाठला आहे.
किशन एंटरटेनमेंटचे निर्माता-दिग्दर्शक कुमार यांनी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच एक हृदयस्पर्शी प्रेमकथा साकारली आहे. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे. आकाश आणि अंजली या दाम्पत्याच्या संघर्षमय जीवनप्रवासाला पडद्यावर आणण्याचे धाडस कुमार यांनी दाखवले आहे.
चित्रपटात आकाश आणि अंजलीची भूमिका अनुक्रमे सिद्ध मुलीमनी आणि रेश्मा यांनी साकारली आहे. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमी चालवणारा आकाश एका साध्या, निरागस मुली अंजलीच्या प्रेमात पडतो. दोघांचे प्रेम कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबद्ध होते. संसार सुखाचा प्रवास करत असतानाच देवदर्शनाला गेल्यावर घडलेल्या अपघातानंतर अंजलीला ब्रेन ट्यूमर असल्याचे समजते आणि त्या क्षणापासून या दाम्पत्याच्या आयुष्यात संघर्षाचा नवा अध्याय सुरू होतो.
‘लव्ह यू मुद्धु’ हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून प्रेम, त्याग, समर्पण आणि एकमेकांसाठी जगण्याची ओढ यांचा भावनिक आविष्कार आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करत नात्यांचं मोल जपणाऱ्या या जोडप्याची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक कुमार यांनी व्यक्त केला.
या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर प्रचंड गाजली असून, प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या या यशानंतर चित्रपटाचे मराठी डबिंग करण्याचा आणि पार्ट टू बनवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
रीलस्टार आकाश नारायणकर म्हणाले,
> “माझ्या रील्सना नेहमीच लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पण आमची ‘रिअल स्टोरी’ मोठ्या पडद्यावर येईल, हे कधीच वाटलं नव्हतं. आमच्या संघर्षाची ही कहाणी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचत आहे, याचा आनंद शब्दांत मावणार नाही.”
तर अंजली शिंदे-नारायणकर भावना व्यक्त करत म्हणाल्या,
> “आमच्या आयुष्यातील सत्य घटनेवर चित्रपट बनवल्याचा मला अभिमान आहे. माझ्या पतीने माझ्यासाठी केलेला संघर्ष आज सर्वांच्या समोर येतो आहे, ही माझ्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरेल.”
दिग्दर्शक कुमार म्हणाले,
> “आकाश आणि अंजलीची कहाणी ऐकताना डोळ्यांत पाणी आलं. त्यांच्या जीवनातील नात्यांचा भावबंध, त्यांचं समर्पण हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारं आहे. हा चित्रपट पाहून सिनेमागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले असतील, यात शंका नाही.”

‘लव्ह यू मुद्धु’ — प्रेम, संघर्ष आणि नात्यांचं खरं सौंदर्य दाखवणारा हृदयस्पर्शी चित्रपट
आजपासून कर्नाटकातील सर्व प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, लवकरच मराठी आवृत्तीतही प्रेक्षकांसमोर येणार आहे.
सोलापूरच्या भूमीतून उगवलेली प्रेमाची प्रेरणादायी कहाणी – ‘लव्ह यू मुद्धु’, मोठ्या पडद्यावर!
Back to top button
×
No WhatsApp Number Found!