वागदरीचे माजी जि.प. सदस्य विजयकुमार ढोपरे यांची मागणी : “ओबीसी समाजाला प्राधान्य द्यावे”
अक्कलकोट (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. मात्र या गर्दीत मुळ ओबीसी समाजाला डावलून इतरांना उमेदवारी देण्याची चूक पक्षश्रेष्ठींनी करू नये, असे प्रतिपादन वागदरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार ढोपरे यांनी केले आहे. ते भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत.
वागदरी जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी राखीव असून, भाजपाचे आनंद तानवडे हे दोनवेळा या मतदारसंघातून ओबीसी प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. सध्या पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने ओबीसी समाजात नाराजीची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी देताना मुळ ओबीसी समाजाच्या भावना आणि हित लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी विजयकुमार ढोपरे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात ओबीसी समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या समाजातील पात्र व्यक्तीस उमेदवारी मिळाली पाहिजे. मीही आगामी जि.प. निवडणुकीत भाजपाकडून इच्छुक असून, लवकरच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.”
विजयकुमार ढोपरे यांनी वागदरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून चार कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडले आहेत. सात वेळा ग्रामपंचायतीत विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तसेच एकदा जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी भाजपच्या तिकिटावर काम पाहिले आहे. त्यांचा राजकीय अनुभव आणि जनसंपर्क दांडगा असून, आगामी जि.प. निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!