गावगाथा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पारंपारीक पध्दतीने होणार श्री दत्त जयंती सोहळा.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पारंपारीक पध्दतीने होणार श्री दत्त जयंती सोहळा.

श्रींच्या पारंपारीक पालखी सोहळ्याचेही आयोजन.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.०१/१२/२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे
यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रध्देने साजरा करण्यात येत आहे. दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे.
श्री दत्त जयंती उत्सव गुरुवार दिनांक ०४ डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी होणार आहे.
या दिवशी सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल. परगावाहून भांडुप, घाटकोपर – मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दत्तजयंती दिवशी पहाटे ४ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती
मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. दुपारी ४ ते ५ :३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्या खाली येथील सत्संग महिला भजनी मंडळाचे दत्त जन्म आख्यान, वाचन व भजन करुन सायंकाळी ६ वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात होईल. यावेळी उपस्थित सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर मंदीरात नित्य नियमाने होणारी शेजारती व दर गुरुवारी मंदीर परिसरातच संपन्न होणारा श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार नाही. शुक्रवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता महानैवेद्य आरती
पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल. देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ या वेळेत देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणुक भजन, दिंडया व वाद्यांसह पार पडणार आहे. श्रींची पालखी मिरवणूक रात्री ९:३० वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल, तरी जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा, पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button