अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दत्तजयंती उत्साहात; २६५ लाभार्थ्यांना स्वेटर व महाप्रसाद वितरित

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामीभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांपासून चालू असलेल्या “समर्थ महाप्रसाद सेवा” उपक्रमाला आज चार वर्ष पूर्ण झाली. या औचित्याने एकूण २६५ लाभार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.
महानैवेद्य व आरतीनंतर संकल्प सोडवणे
स्वामीभक्त देणगीदारांच्या हस्ते महानैवेद्य व आरती संपन्न झाल्यानंतर संकल्प सोडण्यात आला. शहरातील निराधार, दिव्यांग नागरिकांना दररोज दोन वेळचा ‘समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर यंदा लाभार्थ्यांना स्वेटरवाटपाचा कार्यक्रम सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर यांच्या हस्ते झाला. या वेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया उपस्थित होते.—
राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. अन्नछत्राची प्रगती उत्तरोत्तर वाढो, अशा शुभेच्छा सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर यांनी व्यक्त केल्या.
“श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारण्याचा अनुभव लाभलेला माझ्यासाठी भाग्याचा क्षण. अन्नछत्र मंडळाचे सामाजिक कार्य अनुकरणीय आहे,” असेही त्यांनी सांगितले
समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना स्वेटर वाटप
दत्तजयंतीनिमित्त लाभार्थ्यांना महाप्रसादाबरोबरच स्वेटर देण्यात आले. विविध भागांतून लाभार्थ्यांना वाहनांद्वारे अन्नछत्रात आणण्यात आले. दररोज २६५ निराधार व दिव्यांग नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची हमी ‘समर्थ महाप्रसाद’ सेवा देते.
अविरत सेवा — लाभार्थ्यांची कृतज्ञता व्यक्त
गेल्या चार वर्षांपासून ऊन, पाऊस, वारा, सण-उत्सव कोणताही अडथळा न येऊ देता अन्नछत्र मंडळाची सेवा अविरत सुरू आहे.
“आम्ही अनेक वेळा उपाशी दिवस काढले आहेत. पण अन्नछत्रामुळे आम्हाला आधार, आपुलकी व काळजी मिळते,”
असे लाभार्थी रत्नाबाई बनसोडे, शरीफ मुल्ला, पार्वती ऐवळे, ललिता होटकर यांनी सांगितले.
समर्थ महाप्रसाद सेवेचा चार वर्षांचा प्रवास
सन २०२१ च्या दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या या सेवेत आज २६५ लाभार्थ्यांना सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळा घरपोच अन्न पुरवले जाते. बाहेरून येणाऱ्या भक्तांची अन्नछत्रात विशेष सोय करण्यात येते, असे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात श्री शितोळे बाबा ट्रस्ट घाटकोपर (मुंबई) यांच्या पालखीचे स्वागत अमोलराजे भोसले यांनी केले.
पोलीस निरीक्षक दिपक भिताडे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त, सेवादाते व मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.
डबा वितरण करणारे अतिश पवार, मारुती बोरकर, अप्पाशा मलवे, शेखर कांबळे, संतोष मोरे यांसह अनेक सेवेकऱ्यांचे या निमित्ताने कौतुक करण्यात आले.



