सी. बी. खेडगी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त १८ तासांचा अखंड अभ्यास उपक्रम
दिनविशेष

सी. बी. खेडगी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त १८ तासांचा अखंड अभ्यास उपक्रम
अक्कलकोट, दि. ८ – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘अखंड १८ तास अभ्यास’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महापुरुषांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकांचे वाचन करत तरुण पिढी आजही वाचन संस्कृती जपत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी असताना दररोज १८ तास अभ्यास करत असत, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा व वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ग्रंथालयात प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एस. शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल प्रा. आर. आर. कांबळे, डॉ. किशोर थोरे, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. विठ्ठल वाघमारे, डॉ. आबाराव सुरवसे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्य प्रवक्ते रविराज पोटे, साहिल कांबळे, दर्शन गायकवाड, प्रीती जैनजांगडे, लक्ष्मी गजधाने, यल्लप्पा शिंदे, दीपक इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
या उपक्रमात एकूण १२६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेत अभ्यासक्रमासह ग्रंथालयातील विविध पुस्तकांचे वाचन केले. प्रसंगी चंद्रशेखर मडीखांबे, शीलामणी बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, वस्तीगृह अधीक्षक माळी, डॉ. सिद्धार्थ मुरूमकर व डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी उपक्रमास भेट दिली. सकाळी ६ वाजता सुरू झालेला हा उपक्रम रात्री १२ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता.
उपक्रमादरम्यान सर्व विद्यार्थ्यांसाठी फळे, अल्पोपहार, भोजन, बिस्किटे, चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी १८ तास अखंड अभ्यास करत त्यांच्या विचारांना भावपूर्ण अभिवादन केले.



