HTML img Tag
अक्कलकोट डेपोचा गोंधळ; वागदरीसह ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल, एस.टी. बस वेळापत्रक कोलमडले…
वागदरी :अक्कलकोट बस डेपोतील ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेसच्या वेळापत्रकाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याने वागदरीसह खैराट, गोंगाव, घोळसगाव परिसरातील प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र–कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी मार्गावरील मुक्कामी बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.
अक्कलकोट येथून सुटणाऱ्या उमरगा–खैराट व घोळसगाव मार्गावरील बसेस नियमित वेळेला न आल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडले आहे. खैराट, गोंगावसह ग्रामीण भागातील विद्यार्थी दररोज वागदरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र सकाळी वेळेवर बस मिळत नसल्याने तसेच संध्याकाळी शाळा सुटल्यावर एस.टी. बस न आल्याने विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागत आहे.
अक्कलकोट बस डेपोमध्ये बस संख्या कमी असल्याचे कारण देत अधिकारी जबाबदारी टाळत असल्याचे चित्र आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे.
जाब विचारण्यासाठी डेपोमध्ये गेलेल्या प्रवाशांना काही अधिकाऱ्यांकडून नीट उत्तर दिले जात नसल्याची तक्रारही वारंवार होत आहे. विशेष म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र एस.टी. बसेसचे ठोस वेळापत्रक आणि नियोजन नसल्यामुळे भाविकांनाही प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वागदरी येथील प्रवासी विनोद घुगरे यांनी बोलताना सांगितले की, “बस वेळापत्रक पूर्णतः विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रवाशांचा वेळ आणि सुरक्षितता याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. तात्काळ उपाययोजना करून बस संख्या वाढविणे गरजेचे आहे.”

तरी अक्कलकोट बस डेपोकडून ग्रामीण भागासाठी अधिक बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, नियमित वेळापत्रक जाहीर करून बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, तसेच प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!