गावगाथा

पुस्तकाचे नाव* – मी पाहिलेला ज्ञानसूर्य *आदर्श केंद्रप्रमुख अरुण मुंगसे यांच्या आठवणींना पुस्तकातून उजाळा*

समीक्षक -* सचिन बेंडभर

*पुस्तकाचे नाव* – मी पाहिलेला ज्ञानसूर्य
*संपादिका* – शारदा अरुण मुंगसे
*प्रकाशक* – यशोदीप पब्लिकेशन, पुणे.
*पृष्ठे* – 86
*मूल्य* – 150 रु.
*मुखपृष्ठ -* – अनुजा मुंगसे
*आवृत्ती -* 1 मे 2024
*समीक्षक -* सचिन बेंडभर
________________________________
*आदर्श केंद्रप्रमुख अरुण मुंगसे यांच्या आठवणींना पुस्तकातून उजाळा*
लोणीकंद केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय अरुण मुंगसे साहेबांनी निवृत्तीनंतर आपली अनेक स्वप्ने उराशी बाळगली होती. कुटुंबासाठी घर, मुलींची लग्न आणि लेखन कार्य हे निवृत्तीनंतर निवांत करू असे ठरवून त्यांनी आपली स्वप्ने अनेकदा आपल्या स्वकियांना बोलून दाखवली होती. त्यांच्या सेवापूर्ती समारंभात त्यांनी ही गोष्ट आपल्या भाषणातही बोलून दाखवली होती. मीना म्हसे, सचिन बेंडभर, विनायक वाळके आणि शहाजी नगरे या साहित्यिक शिक्षकांनी त्यांना आपल्या मनोगतातून पुढील काळात लेखनाचा आग्रह धरला. निवृत्तीनंतर आता बऱ्यापैकी वेळ शिल्लक राहिल, त्यामुळे आता राहिलेल्या गोष्टींना वेळ देता येईल या विचारात असतानाच कोरोनाने जगात थैमान घातले आणि त्यात साहेब गेले.
साहेबांचे पुस्तकाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. परंतु साहेबांवर प्रेम करणारे विद्यार्थी,शिक्षक, मित्र परिवार आणि नातेवाईक हे सर्व एकत्र आले त्यांनी साहेबांच्या स्वप्नांना नवसंजीवनी देण्याचे काम केले. संपादिका शारदा अरुण मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या सहवासात असलेले विद्यार्थी शिक्षक अधिकारी मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी साहेबांवर लेख लिहून ते एकत्रित पुस्तक रूपात प्रकाशित करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे सर्वांनी साहेबांविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करत आपला लेख संपादकांना दिला. संपादकांनी हे सर्व लेख एकत्रित करत त्यांची सुंदर लेखमाला पुस्तकात गुंतली आणि साहेबांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप आले. तसेच साहेबांच्या आठवणीतील अनेक प्रसंगांना या पुस्तकाच्या माध्यमातून उजाळा मिळाला.
हे केवळ एक पुस्तक नाही तर साहेबांवर प्रेम करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्या आठवणींचा लेखाजोखा आहे. साहेबांच वाचन हे प्रचंड होते आणि त्यांच्या बोलण्यातून या गोष्टीची जाणीव ही ऐकणाऱ्याला नेहमी व्हायचे. कारण आईच्या मायेने बोलणारे साहेब हे इतर राजकारणी शिक्षकांना मात्र चाल जोडीतून ठेवून द्यायचे. भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी या तुकाराम महाराजांच्या ऊक्ती प्रमाणे सरांचे वागणेही तसेच होते.
एकूण 38 लेखांची ही मालिका असून प्रत्येक लेख हे मुंगसे साहेबांचे वेगळेपण जपत आहे. जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मीना म्हसे आपल्या इच्छापूर्ती या लेखात साहेबांविषयी लिहितात,
आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात. प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे, तुम्ही विचारांनी कायम आमच्या सोबत आहात. कधी साहेब म्हणून राहिलाच नाहीत. कधी सायबी हेका गाजवलाच नाहीत. नेहमी आमच्यातीलच होऊन राहिलात. प्रत्येकातल माणूसपण मात्र जपत गेलात.
मांजरेवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक विनायक वाळके सर आपल्या मला भावलेले मुंगसे गुरुजी या लेखात त्यांच्याविषयी लिहितात,
सन 2012 मध्ये मला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यावेळी मुंगसे गुरुजी प्रभारी मुख्याभक होते. त्यांचेच मार्गदर्शक घेऊन मी फाईल तयार केली. त्यावर्षी मी माझ्या वर्गासाठी सेमी इंग्रजी सुरू केले होते यासाठी ही गुरुजींनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्याच मार्गदर्शनाने मी पुरस्काराचा मानकरी ठरलो.
मनसे साहेबांचे आयुष्य म्हणजे इतरांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होय. कुणीही अडचण घेऊन गेले आणि त्यावर त्यांनी मार्ग सांगितला नाही असे कधी झालेच नाही कुणाच्याही सुखदुःखात ते नेहमी सामील होत. त्याच्या अडीअडचणी समजून घेत व त्यावर मार्ग काढत. प्रत्येकाला आईच्या मायेने जपणारी साहेब म्हणजे शिक्षण क्षेत्रातील महान तपस्वी, विचारवंत, व्याख्याते आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होय. हल्लीच्या पिढीतील सचिन बेंडभर, मीना म्हसे, शहाजी नगरे आणि विनायक वाळके ही सर्व लेखक मंडळी त्यांच्या तालमीत तयार झाली आहेत.
पुणे येथील यशोदीप पब्लिकेशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. चित्रकार माननीय अनुजा मुंगसे, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगाला अनुरूप साजेशी चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. शारदा अरुण मुंगसे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मुंगसे साहेबांच्या सर्व हितचिंतकांना नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना या पुस्तकाच्या निर्मितीतून साहेबांचा सहवास लाभणार आहे. त्यांचे विचार हे नेहमी त्यांना प्रेरणा देत राहतील. हाच उद्देश मनात ठेवून संपादकांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
————————————
*सचिन बेंडभर*
महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button