वागदरी येथील शाळा व परमेश्वर मंदिरातील आरओ मशिन दर्जाहीन निकृष्ठ –चौकशीची मागणी ..
वागदरी (ता. अक्कलकोट) :वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत तसेच श्री परमेश्वर मंदिरात बसविण्यात आलेली आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रे अत्यंत दर्जाहीन असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निकृष्ट आरओ मशिनमुळे विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून नवीन दर्जेदार आरओ मशिन बसवावीत, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वागदरी ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व श्री परमेश्वर मंदिर परिसरात आरओ मशिन बसविण्यात आली. मात्र, बसविल्यापासूनच या मशिनच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात होती. तक्रार कोण करणार, या संभ्रमामुळे काही काळ हा विषय दुर्लक्षित राहिला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ता उमेश पोमाजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, प्रत्यक्षात सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या आरओ मशिनसाठी जवळपास २ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच श्री परमेश्वर मंदिरात बसविण्यात आलेल्या आरओ मशिनसाठी सुमारे २ लाख रुपये किंमत असताना तब्बल ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित ठेकेदारासह एनओसी देणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दर्जाहीन आरओ मशिन बसवून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळणे तात्काळ थांबवावे आणि त्या ठिकाणी नवीन, दर्जेदार व आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आरओ मशिन त्वरित बसवावीत, अशी स्पष्ट मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश पोमाजी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा वागदरीतील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!