ST bus ticket price increase | सर्वसामान्यांच्या लालपरीच्या तिकिटात तब्बल इतक्या टक्क्यांची वाढ ; उन्हाळ्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री…

पुणे (प्रतिनिधी): सर्व सामान्यांची लालपरी अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठी आता खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे. कारण, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकीट दरात 10 टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
15 एप्रिलपासून ही वाढ लागू होणार आहे. यामुळे तिकीट दरात वाढ होणार असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
एसटी महामंडळाने सुट्टीचा हंगाम पाहता 10 टक्के हंगामी दरवाढ केली आहे. तसेच प्रति तिकिटामागे 2 रुपये असा स्वच्छता अधिभार सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तिकीट दरवाढ सरसकट सर्वच साध्या गाड्यांना लागू असणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी साध्या एसटीचे तिकीट दर 281 रुपये आहे. मात्र, हंगामी दरवाढ लागू झाल्यावर हे तिकीट 312 रुपये आणि 2 रुपये अधिभार असे एकूण 314 रुपये होणार आहे.
गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार तात्पुरती भाडेवाढ करण्यात येत असते. गेल्यावर्षी दिवाळीच्या सुमारास हंगामी भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र, नंतर ही भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. पण आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुन्हा एकदा हंगामी दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



