आंबेडकर जयंती व स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये पाणपोई सुरू कराव्यात – मानवता फाऊंडेशनची मागणी
अक्कलकोट :
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठी वाढ होत असल्याने नागरिक, प्रवासी व स्वामी भक्तांना पिण्याच्या पाण्याची अडचण भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून अक्कलकोट शहरात नगरपरिषदेच्या वतीने ठिकठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याच्या पाणपोया सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी मानवता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन देण्यात आले. सध्या वाढत्या उष्णतेमुळे प्रवासी, भक्त, वयोवृद्ध, अबाल-वृद्ध, विद्यार्थी, कामगार आणि सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासत आहे. विशेषतः अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असून शहरात गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि समता पंधरवडा निमित्त नागरिक मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याच्या पाणपोया सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपरिषदेने शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक परिसर, मंदिर परिसर आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पाणपोई सुरू केल्यास नागरिक व भक्तांना मोठा दिलासा मिळेल, असे सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, ज्योतिबा पारखे, रशीद खिस्तके, सैपन शेख, महम्मद शिकलगार, अशरफ गोलंदाज, महिबुब अन्सारी, हर्षवर्धन देडे आदी उपस्थित होते.
चौकट :
पाणपोईसह मोफत आरोग्य शिबिराचीही मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व समता पंधरवडा निमित्त अक्कलकोट शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाणपोया सुरू करण्याबरोबरच नगरपरिषदेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करावे, अशी मागणी मानवता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्त, प्रवासी व नागरिकांची सोय व्हावी यासाठी पाणपोई सुरू करणे आणि आरोग्य शिबिर घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी नमूद केले.
— मानवता फाऊंडेशन, अक्कलकोट
Back to top button
×
No WhatsApp Number Found!