गावगाथा

२५ वर्षांनी पुन्हा भेटले विद्यार्थी; आठवणींचा सुवर्णसोहळा चपळगावात रंगला

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

२५ वर्षांनी पुन्हा भेटले विद्यार्थी; आठवणींचा सुवर्णसोहळा चपळगावात रंगला

अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगावच्या १९९९ व २००० च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनंतर आयोजित केलेला स्नेहमेळावा अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला. जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटताना शाळेच्या आठवणींनी साऱ्यांनाच अक्षरशः भूतकाळात नेले.
शाळेच्या परिसरात पुन्हा एकत्र येताच अंगणातल्या गप्पा, वर्गातील खोडकर प्रसंग, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि शालेय जीवनातील अनेक आठवणी ताज्या झाल्या. एकेकाळी एकाच बाकावर बसून शिक्षण घेतलेली ही मंडळी आज विविध क्षेत्रांत कार्यरत असून, आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून व समाजाच्या तळागाळातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर आज विविध क्षेत्रांत यश मिळवले आहे. गावाच्या मातीतून उभ्या राहिलेल्या या विद्यार्थ्यांनी शहरातील स्पर्धात्मक वातावरणातही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे ग्रामीण विद्या विकास विद्यालय, चपळगाव या संस्थेचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जाते.
या स्नेहमेळाव्याला संस्थेचे रविकांतजी पाटील, मुख्याध्यापक बानेगाव सर, माने सर, गोविंद सर, घोडके सर, हुलमनी सर, कवदे सर, पटेल सर तसेच इतर अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षक उपस्थित होते. गुरुजनांना भेटताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नकळत अश्रू दाटले. कारण हाच तो हात होता ज्यांनी त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली होती.
आज चाळीशी पार केलेले हे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा लहान झाल्यासारखे वाटत होते. कुणी जुन्या आठवणी सांगत होते, तर कुणी शाळेतील किस्से सांगत हास्याची उधळण करत होते. वातावरण इतके आपुलकीचे आणि भावनिक झाले होते की, हा कार्यक्रम एखाद्या कुटुंबीय सोहळ्यासारखाच वाटत होता.
या कार्यक्रमाचे नियोजन अनुपम कवदे, शंकर हुलमनी, डॉ. सतीश दोड्याळे, खलील पटेल, विद्याधर शिमगे तसेच इतर मित्रांनी अत्यंत सुबक व नेटक्या पद्धतीने केले होते. प्रत्येक छोट्या गोष्टीत त्यांनी मनापासून परिश्रम घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम संपल्यानंतर कुणी पुणे, कुणी मुंबई तर कुणी सोलापूरकडे रवाना झाले. मात्र यावेळी ते फक्त निघाले नव्हते, तर मनात भरभरून आठवणी, डोळ्यांत ओलावा आणि पुन्हा भेटण्याचे वचन घेऊनच परतले.
कारण काही नाती अशी असतात, जी काळाच्या ओघात दूर जात नाहीत; उलट प्रत्येक भेटीत अधिकच घट्ट होत जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button