गावगाथा

शिवाजी महाराजांचे नेतृत्व व डॉ. आंबेडकरांचे विचार तरुणांसाठी दिशादर्शक — प्रा. डॉ. किशोर थोरे

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे प्रेरणादायी व्याख्यान; विद्यार्थी मंत्रमुग्ध

शिवाजी महाराजांचे नेतृत्व व डॉ. आंबेडकरांचे विचार तरुणांसाठी दिशादर्शक — प्रा. डॉ. किशोर थोरे

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे प्रेरणादायी व्याख्यान; विद्यार्थी मंत्रमुग्ध

सोलापूर — आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. किशोर थोरे यांनी केले. ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे आयोजित प्रेरणादायी व्याख्यानात ते बोलत होते. त्यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थित विद्यार्थी व पालक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
आपल्या भाषणात प्रा. डॉ. थोरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते अत्यंत दूरदृष्टी असलेले जाणते राजे होते. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर सुराज्य घडवण्यासाठीही अथक प्रयत्न केले. त्यांच्या मुत्सद्दीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरचा तह होय. संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले. शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, धैर्य आणि निर्णयक्षमता यांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरही सविस्तर भाष्य केले. आजची तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. डॉ. आंबेडकरांनी कामगार, महिला व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ‘हिंदू कोड बिल’च्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, ते विधेयक फेटाळले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, ही त्यांची तत्त्वनिष्ठा तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, भारतीय राज्यघटनेमुळेच आज ७५ वर्षांनंतरही भारत एकसंध व मजबूत राष्ट्र म्हणून उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे कार्यक्रमातील वातावरण प्रेरणादायी झाले.
कार्यक्रमाला कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, संगणक विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, ईएनटीसी विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. एस. बी. गडवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. आरती वळसंग यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button