गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नियोजित पाच मजली प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भव्य सोहळा; ६० कोटींच्या अत्याधुनिक महाप्रसादगृहाचे कामही वेगाने सुरू

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नियोजित पाच मजली प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भव्य सोहळा; ६० कोटींच्या अत्याधुनिक महाप्रसादगृहाचे कामही वेगाने सुरू

अक्कलकोट (प्रतिनिधी) :
“अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त… सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय…” तसेच “श्री अन्नपूर्णा देवी” आणि “श्री लक्ष्मीनारायण” यांच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्री गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या महाप्रसादगृहालगत नियोजित पाच मजली प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा रविवारी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी विरक्त मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी, ज्येष्ठ ख्यातनाम गायिका उषाताई मंगेशकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज, साई ग्रुप व साईसुश्रुत कन्स्ट्रक्शनचे संस्थापक अध्यक्ष अरुण आडकर, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, शुभम नांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास तांबे, प्रकल्प संचालक इंजी. प्रशांत काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


समारंभात उपस्थित मान्यवरांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने गेल्या ३९ वर्षांपासून अखंडपणे सुरू ठेवलेल्या अन्नदान सेवेचे कौतुक केले. हजारो भाविकांना दररोज महाप्रसादाची सेवा देणारे हे अन्नछत्र भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भक्ताभिमुख आधुनिक प्रशासकीय इमारत उभारणार
महाप्रसादगृहालगत उभारण्यात येणारी पाच मजली प्रशासकीय इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या इमारतीत स्वागत कक्ष, प्रशासकीय कार्यालये, व्यवस्थापकीय दालन, प्रवेश कक्ष, सभागृह, भांडार, अतिथी भोजन कक्ष, विशेष अतिथी भोजन कक्ष, अतिथी निवास व्यवस्था तसेच विविध प्रशासकीय विभागांची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाविकांना अधिक सुलभ व दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने ही इमारत भक्ताभिमुख संकल्पनेतून उभारण्यात येत आहे.


६० कोटींचे भव्य महाप्रसादगृह साकारत आहे
न्यासामार्फत उभारण्यात येणारे महाप्रसादगृह मंदिरासारख्या आकर्षक वास्तुरचनेत बांधले जात आहे. संपूर्ण इमारत वातानुकूलित असून तिचे एकूण बांधकाम क्षेत्र १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट आहे. इमारतीच्या टेरेसवर ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून ती भाविकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.
या महाप्रसादगृहात एकावेळी २,५०० भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, ५ हजार भाविकांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षागृह उभारले जाणार आहे. तळघरात धान्य व भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी, एका तासात ८०० चपात्या तयार करणाऱ्या सात स्वयंचलित मशिन्स, आधुनिक डिश वॉशर तसेच संपूर्ण इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.


सुमारे ६० कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला नगरपालिकेची बांधकाम परवानगी मिळाली असून नोव्हेंबर २०२४ पासून काम सुरू आहे. येत्या दोन वर्षांत हे महाप्रसादगृह भाविकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली.
समारंभास न्यासाच्या विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग, स्वामी भक्त आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजनानंतर धार्मिक विधी, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button