गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

उषा मंगेशकर यांच्या ‘रंग उषेचे’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत विद्यार्थी, गुणीजनांचा गौरव, अन्नछत्र मंडळास आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ
उषा मंगेशकर यांच्या ‘रंग उषेचे’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत विद्यार्थी, गुणीजनांचा गौरव, अन्नछत्र मंडळास आयएसओ प्रमाणपत्र प्रदान
अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भव्य आणि दिमाखदार शुभारंभ रविवारी (दि. १९) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उद्घाटन सोहळ्याला भाविकांनी व रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

विरक्त मठाचे पू. बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे अण्णू महाराज, साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अरुण आडकर, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पवार, चॅलेंजर स्पोर्ट्सचे अतिश शहा, आरती शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गंगा आरतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, नटराज व भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर आणि सहकारी कलाकारांनी सादर केलेल्या ‘रंग उषेचे’ या सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मराठी भावगीते, अभंग, भक्तिगीते तसेच हिंदी सदाबहार गीतांनी रसिकांची मनं जिंकली. नेहा चिपळूणकर, हेमंत वाळूंजकर, रसिका गानू, धवल चांदवडकर, विवेक परांजपे, नरेंद्र चिपळूणकर, राजेंद्र साळुंके, नितीन शिंदे, रोहित जाधव, आनंद घोरारे, प्राजक्ता मोडक तसेच निवेदक प्रवीण जोशी यांनी कार्यक्रमाला सुरेल साथ दिली.
कार्यक्रमातील सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उषा मंगेशकर यांचा विशेष सत्कार संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याच प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा श्रींची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांनी वैदिक मंत्रोच्चारात श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन केले.
गुणीजन व गुणवंतांचा गौरव
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अॅड. विक्रम येडूर (सोलापूर), एसटी चालक इरन्ना सतीश इंडे, बँक अधिकारी इरेश बागेवाडी व शिक्षक शिवशंकर बिराजदार यांना ‘गुणीजन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच अक्कलकोट तालुक्यात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचाही न्यासाच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला न्यासाच्या विश्वस्त, पदाधिकारी, महिला सदस्य, सेवेकरी, कर्मचारी, भाविक आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी केले.
आज ‘संगीत संजे’चा कार्यक्रम
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त सोमवार (दि. २०) रोजी सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.३० या वेळेत कर्नाटकचे सुप्रसिद्ध गायक राजेश कृष्णन यांचा ‘संगीत संजे’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
चौकट : राज्य मंत्रिमंडळ व मुंबई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळातील मान्यवर तसेच मुंबई महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शुभ संदेश पाठवून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट : ‘भक्ती रन’ टी-शर्टचे अनावरण
२६ जुलै रोजी पहाटे ५.३० ते सकाळी ९.३० या वेळेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य ते अध्यात्म’ या संकल्पनेवर आधारित ‘भक्ती रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाच्या टी-शर्टचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button