*चिमुकली सांची डाकवे लावणार ‘पुस्तकांचं झाड’*
वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चिमुकली सांची रेश्मा संदीप डाकवे ही चक्क ‘पुस्तकांचं झाड’ लावणार आहे.

*चिमुकली सांची डाकवे लावणार ‘पुस्तकांचं झाड’*

तळमावले/वार्ताहर
वाचनसंस्कृतीला प्रेरणा आणि बळ देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चिमुकली सांची रेश्मा संदीप डाकवे ही चक्क ‘पुस्तकांचं झाड’ लावणार आहे. याबाबतच्या उपक्रमाची अधिक माहिती अशी की, कु.सांची डाकवे हिचा दुसरा वाढदिवस 4 एप्रिल रोजी येत आहे. त्यानिमित्त ‘पुस्तकांचं झाड’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या दिवसापासून डाकवे परिवार आपल्या घरात वाचनासाठी विनामुल्य पुस्तके ठेवणार आहेत. झाडे ज्याप्रमाणे आपणांस आॅक्सिजन, पाने, फळे आणि फुले देतात. त्याचपध्दतीने ‘पुस्तकांचं झाड’ मधील पुस्तके ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हे देणार आहेत. यातील पुस्तके वाचनासाठी विनामुल्य असतील त्याच्या नोंदीसाठी रजिस्टर तसेच उपक्रमाबाबतच्या सुचनांसाठी अभिप्राय वही देखील ठेवली जाणार आहे.
‘‘चिमुकली सांची जपणार वाचन संस्कृती, वाचनाने साधणार सर्वांचीच प्रगती’’ अशी टॅगलाईन या संकल्पनेला दिली आहे. दरम्यान, गतवर्षी सांचीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या ठेवपावतीच्या व्याजाच्या रकमेतून न्यू इंग्लिश स्कूल काळगांव मध्ये इ.दहावीत मुलींमध्ये प्रथम आलेल्या कु.सानिका सुरेश पाटील या मुलीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक देण्यात येणार आहे.
यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार, बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार इ.उपक्रम राबवले आहेत.
प्रत्येकजण वैचारिक आणि सांस्कृतीकरीत्या समृध्द होण्यासाठी ‘पुस्तकांचं झाड’ ही वेगळी संकल्पना राबवली असून हा उपक्रम अधिकाधिक समृध्द होण्यासाठी दानशूरांनी पुस्तके दान करण्याचे आवाहन ही डाकवे परिवाराने याप्रसंगी केले आहे. पुस्तके देणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आकर्षक कृतज्ञता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शिवाय वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचे आत्मीक समाधानही त्यांना मिळेल.
डाकवे परिवाराने वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, सांचीच्या बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार इ.उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी लेकीच्या वाढदिवसानिमित्त डाकवे परिवाराने राबवलेला उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. ‘पुस्तकांचं झाड’ या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी आपण 9764061633 या क्रमांकावर संपर्क साधा.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे व परिवाराने राबवलेले उपक्रम प्रशंसनीय आहेत. या उपक्रमाला अॅड.जनार्दन बोत्रे, बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे, सविता निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते. कुटूंबातील प्रत्येक कार्यक्रमामधून समाजासाठी काहीतरी करावे असा ध्यास डाकवे परिवाराने घेतला आहे. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी भरीव कामगिरी केली जात आहे.

*चौकट : काय आहे ‘पुस्तकांचं झाड’ संकल्पना :*
‘पुस्तकांचं झाड’ म्हणजे पुस्तकांची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण. ज्याप्रमाणे झाड आपणांस आॅक्सिजन, पाने, फळे आणि फुले देतात इ.देवून जगवते. त्याचप्रमाणे पुस्तके आपणास ज्ञान, माहिती आणि मनोरंजन देवून आपले विचार समृध्द करते. पुस्तकाच्या झाडाकडे असलेले पुस्तक वाचकांना विनामूल्य वाचावयास मिळेल. त्याची नोंद रजिस्टरमध्ये असेल.
