अक्कलकोट येथील कापसे परिवाराने साधला ‘इफ्तार पार्टी’माध्यमातून हिंदू-मुस्लिममध्ये एकोपा…
रमजान विशेष २०२३

अक्कलकोट येथील कापसे परिवाराने साधला ‘इफ्तार पार्टी’माध्यमातून हिंदू-मुस्लिममध्ये एकोपा…

अक्कलकोट – हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल.हाच हेतू ठेवून अक्कलकोट येथील कापसे परिवाराने वेगळा आदर्श ठेवला आहे.
कापसे ऑप्टिकल्स व सिध्दार्थ ट्रॅव्हल्स वतीने अक्कलकोट येथे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहून इफ्तार पार्टीचा आनंद घेतला आणि शुभेच्छा दिल्या कुठलेही गाजावाजा न करता सर्वसामान्य मुस्लिम बांधवाना बोलवून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले.
अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचे नुकतेच यात्रा संपन्न झाले. तसेच रमजान महिना सुरू असल्यामुळे अक्कलकोट मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यासाठी कापसे परिवारांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून वेगळा संदेश दिला आहे.समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल.

यावेळी कापसे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कापसे परिवार परिश्रम घेतले.
