अक्कलकोट शास्त्रीय संगीताचे थोर उपासक असलेले गंधर्वयोगी संगीतालंकार श्री.शरणप्पा कलबुर्गी सरांना भावपूर्ण स्वरांजली
स्वर थांबले

अक्कलकोट : येथील सोलापूर जिल्यातील शास्त्रीय संगीताचे थोर उपासक असलेले गंधर्वयोगी संगीतालंकार श्री.शरणप्पा कलबुर्गी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी बुधवार, दि.२४ मे २०२३ रोजी दुपारी ठिक १२:३० वाजता अल्पश्या आजाराने निधन झाले. संपूर्ण सोलापूर जिल्यातील संगीतप्रेमी तसेच अनेक लोक हळ-हळ व्यक्त करत आहेत.

अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या शहराने विविध क्षेत्रात अनेक गुणीजनही दिले आहेत. भले ते दुर्लक्षित असोत त्यांचे योगदान नक्कीच दुर्लक्ष करण्याजोगे नाही. पण भारतात शास्त्रीय संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे, तीच भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा कलबुर्गी यांच्या रुपात या शहरालाही लाभली.

अक्कलकोट मधल्या तत्कालीन तरुणपिढीमध्ये संगीत कलेचे आकर्षण निर्माण करण्यात आणि आज त्यांच्या तपश्चर्येचे फळ म्हणून संगीत कलेला मनोभावे पूजलेले, संगीत ज्ञानसागरात स्वतःला बुडवून घेतलेले अनेक नामांकित संगीत पुजारी वेगवेगळ्या शहरात संगीत शारदेची मनोभाव सेवा करीत असल्याचे दृश्य दिसते आहे. हे सर्व श्रेय एकंदर कलबुर्गी यांनाच.

यांचा जन्म १ ऑगस्ट, १९४० साली झाला. मुळचे कर्नाटकातील असलेले कलबुर्गी यांना संगीताचा वारसा त्यांच्या आजोबांपासुनच मिळाला होता, घरात संगीताचे संस्कार लाभले असले तरीही कलबूगी यांनी बालपणीच आळंद येथील चंद्रशेखर गुरुजींकडे संगीत शारदेची उपासना करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखर गुरुजींकडे त्यांनी तब्बल १२ वर्षे तालिम घेतली. कलबुर्गी यांनी शालेय जीवनात संगीताचा चांगला ठसा उमठविला. पुढे त्यांनी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतात अलंकार केलं, तबला वादनात विशारद तर हार्मोनियम वादनाता ते अलंकार करून संगीत शारदेच्या अखंड सेवेत रुजू झाले.

पुढे संगीताच्या या व्यासंगाने कलबुर्गी यांनी १९६५ साली बळवंतराव शिंदे गुरुजींच्या मार्गदर्शनाने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी अक्कलकोटसारख्या छोट्या शहरामध्ये संगीताची गोडी वसवणं अवघड होतं पण कलबुर्गी यांनी त्यातही प्रगत प्रचिती घडवून आणला. अक्कलकोट सारख्या छोट्या शहरात त्यांनी संगीत व गायनाचे संस्कार केले. संगीतरत्न कलबुर्गी यांनी पुढे मंगळूरे प्रशालेत संगीत शिक्षकाची नोकरी पत्कारली. मंगरुळे प्रशालेत त्यांनी १२ वर्षे कार्य केलं. प्रशालेतील मुला-मुलींना संगीत संस्काराने घडविले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यात प्रगती केली. ज्ञान जितके वाटतो तितकेच ते वाढत जाते कलबुर्गी यांनीही संगीत ज्ञानाला दाही दिशा दिल्या. मंगरुळे प्रशालेमध्ये शिक्षक होऊन मुलांवर संगीत संस्कार घडवून पुढे त्यांनी अक्कलकोट मधील शहाजी प्रशालेत कार्यरत झाले. प्रत्येक कलाकाराकडे एक वेगळी अदा असते आणि ती जन्मतःच अवगत झालेली असते. ते ओळखणं आणि जोपासणं हे गुण कालबुर्गी यांनी अविरत ठेवलं. त्यांच्या या कालागुणांना शहाजी, प्रशालेत अधिकच झळाळी निर्माण होत गेली. प्रशालेतील संगीत गायन, वादन प्रेमींना त्यांनी करण्याबरोबरच संगीत ऐकणं ही शिकवलं आणि संगीताची गोडी वाढविली. शालेय जीवनामध्ये संगीत वादनांचे संस्कार हे अभ्यास- पूर्ण वातावरणासाठी पूरक व पोषक ठरते आणि हेच संगीतरत्न कलबुर्गी यांच्या संगीतविदयेमुळे घडून आले.

आज शास्त्रीय संगीताकडे युवापिढीचा कल वाढत चालला आहे ही समाधानाची बाब कलबुर्गी यांनी अक्कलकोट मध्ये नव्याने वसविली.
संगीतरत्न शरणप्पा कलबुर्गी हे संगीत अलंकार होते. ‘ख्याल गायकी’ मध्ये ते प्राविण्य होते. कलबुर्गी यांची गायनाच्या खासियत बरोबर तबला, पखवाज, हार्मोनियम, सतार, क्लोरोनेट या वाद्यांवरही त्यांची चांगली हुकूमत होती. अनेक मान्यवर गायकांबरोबर त्यांना अनेक मैफिली गाजविली आहेत.
शरणप्पा कलबुर्गी यांना एका अग्रलेखात ‘दुर्लक्षित संगीतरत्न-कलबुर्गी’ असे संबोधले गेले आहे. यामागची पार्श्वभूमी अशी आहे की, संगीतरत्न कलबुर्गी हे असे संगीतप्रेमी होते, की त्यांनी प्रदर्शनापेक्षाही जास्त संगीतज्ञानाचा प्रसार केला आहे. आणि तेच ज्ञान आज मोठ्या संखेने वेगवेगळ्या स्वरुपात झळकताना दिसत आहे.
– मयूर स्वामी (सरांचा विद्यार्थी)