आषाढीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ; चंद्रभागा नदीपात्रातून काढला ४८ टन कचरा*
आषाढीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ; चंद्रभागा नदीपात्रातून काढला ४८ टन कचरा*
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230615-WA0045-780x470.jpg)
आषाढीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ; चंद्रभागा नदीपात्रातून काढला ४८ टन कचरा*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त नगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंटाची स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे. चंद्रभागा नदीपात्रातून यापूर्वी ३२ टन तर बुधवारी (ता. १४) १६ टन असा एकूण ४८ टन कचरा काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.
चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत असून, पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य , कपडे, कचरा नदीपात्रात दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर जेसीबी, डंपरच्या साहाय्याने नदी पात्रातील निर्माल्य बाहेर काढले जात आहे. येत्या २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता सुमारे १२ ते १५ लाख भाविक येतात. भाविकांना पंढरपुरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन व प्रशासनाकडून कामे सुरू आहेत.आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ८ व ९ जून रोजी पालखी मार्ग तसेच पंढरपूर येथे भेट दिली. यावेळी आयोजित बैठकीत चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रभागा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. बुधवारी नगरपालिकेचे ४० कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. यात आणखी वाढ करून दररोज १०० कर्मचार्ऱ्यांव्दारे यात्रा कालावधीपर्यंत स्वच्छता मोहीम सुरु ठेवण्यात येणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
सद्या विष्णुपद बंधारा (गोपाळपूर) येथील बंधाऱ्यातील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आपसूकच पुंडलिक मंदिर परिसरातील चंद्रभागा नदीपात्रातील पाणी देखील कमी होऊ लागले आहे. त्यामुळे पाण्यात टाकण्यात आलेली तसेच वाहत आलेली फाटकी कपडे, निर्माल्य, प्लास्टिक आदी गोळा करण्याचे काम नगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
गोळा करण्यात आलेले निर्माल्य जेसीबी व डंपरच्या साहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढले जात आहे. त्याचबरोबर नदीपात्रात जलप्रदूषण होऊ नये यासाठी मोकाट गायी, म्हशी आदी प्राणी तसेच वाहने नदीपात्रात धुतली जाऊ नयेत यासाठी दक्षता घेतली जात आहे. नदीपात्रात धुतल्या जाणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. स्नान करताना भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच नदीपात्र स्वच्छ राहील याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत असून त्यासाठी नदीपात्रात पथकांची नेमणूक केली असल्याचेही मुख्याधिकारी श्री. माळी यांनी सांगितले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)