सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत…. बसवराज पाटील
दत्तप्रसाद शेळके यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा

सेवाभावी वृत्तीने काम करणारी माणसे दुर्मिळ होत आहेत…. बसवराज पाटील
दत्तप्रसाद शेळके यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा

मुरूम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : सध्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी उणीव भासत आहे. दिवंगत माधवराव(काका) पाटील यांनी त्यांच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांची निवड केली ते कर्मचारी आज देखील तितक्याच निष्ठेने काम करत असल्याचे जाणवते अशा कर्मचाऱ्यांचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. संस्थेबरोबरच पाटील परिवाराशी देखील अशा कर्मचाऱ्यांचे ऋणानुबंध कायम राहिले आहेत. अशा चांगल्या सेवेचा सत्कार होतो आहे. सेवाभावी वृत्तीची माणसे आज दुर्मिळ होत असल्याचे मत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. दत्तप्रसाद शेळके यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम माधवराव पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. २०) रोजी अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, विठ्ठल साईचे संचालक माणिकराव राठोड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, मुख्याध्यापिका महानंदा रोडगे, देवेंद्र कंटेकूरे,भालचंद्र लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिवंगत माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगर शिक्षण विकास मंडळ संस्थेच्या वतीने बसवराज पाटील यांच्या हस्ते दत्तप्रसाद शेळके व सौ. अन्नपूर्ण शेळकेताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेतील विविध शाखांच्या प्रमुखांकडून शेळके यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य कमलाकर कांबळे व प्राचार्य अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, काकांनी दत्तप्रसाद शेळके यांना संस्थेत सेवा करण्याची संधी दिली. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभा असलेल्या काकांच्या पुतळ्याच्या समोरच आज त्यांची सुंदर आणि देखणी वास्तु उभी झाल्याने निश्चितच काकांना देखील समाधान वाटत असेल. याचा देखील आम्हाला मनस्वी आनंद वाटतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर वडगावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार उल्हास घुरघुरे यांनी मानले. यावेळी शेळके परिवारावर प्रेम करणारे आप्तमित्र, पाहुणे व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित शेळके यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी बोलताना बसवराज पाटील, बापूराव पाटील, कमलाकर कांबळे, अशोक सपाटे, माणिक राठोड व अन्य.
